बहुचर्चित श्री कुलस्वामीनी महिला अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या ₹10.68 कोटी अपहार प्रकरण कैलास खर्जुले यांना जामीन मंजूर
ॲड अजय उर्फ बंटी देशमुख
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. 28 जुलै : जिल्ह्यातील बहुचर्चित श्री कुलस्वामीनी महिला अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. येथील सुमारे ₹10.68 कोटींच्या कथित अपहार व फसवणूक प्रकरणातील आरोपी कैलास खर्जुले यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती अभय एस. वाघवासे यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दि. 28 जुलै 2026 रोजी हा आदेश दिला.
या प्रकरणात लेखपाल संजय सिताराम जाजू यांनी दि. 6 डिसेंबर 2023 रोजी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीनुसार, श्री कुलस्वामीनी महिला अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाने 4,810 ठेविदारांना अधिक परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जमा झालेल्या एकूण ₹10,68,41,433 रकमेचा कथित अपहार करून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता.
या फिर्यादीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 934/2023 नोंद करण्यात आला. या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 408, 409, 120(ब) तसेच एमपीआयडी (MPID) कायद्याच्या कलम 3 व 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणात सोसायटीच्या सचिवांच्या पती असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले आरोपी कैलास खर्जुले यांनी ॲड. अमोल जी. काळे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.
आरोपीच्या वतीने ॲड. अमोल जी. काळे यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. अजय (बंटी) पंडितराव देशमुख यांनी सहकार्य केले.
या बहुचर्चित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने या प्रकरणाची पुन्हा एकदा जिल्ह्यात चर्चा सुरू झाली असून, पुढील न्यायालयीन प्रक्रिया आणि खटल्याकडे ठेविदारांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा