खासदार संजय देशमुख व खासदार रामराव वडकुते यांची रेल्वे बोर्ड अध्यक्षां सोबत निर्णायक बैठक; विदर्भ–मराठवाड्यासाठी अनेक महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांची मागणी
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, दि. 28 जुलै : विदर्भ व मराठवाडा प्रदेशातील रेल्वे विकासाला गती देण्यासाठी खासदार संजय देशमुख आणि राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांनी रविवारी नवी दिल्ली येथे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांची भेट घेऊन विविध प्रलंबित रेल्वे प्रकल्प, नवीन रेल्वे सेवा आणि प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक असलेल्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी रेल्वे विकासासंदर्भातील विविध मुद्द्यांचे निवेदनही अध्यक्षांना सादर करण्यात आले.
खासदार संजय देशमुख यांनी सांगितले की, विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही प्रदेशांमध्ये अद्यापही रेल्वे कनेक्टिव्हिटी अपुरी असून, औद्योगिक, शैक्षणिक, कृषी आणि व्यापारी विकासासाठी दर्जेदार रेल्वे सुविधांची अत्यंत गरज आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकल्पांना गती देणे आणि नवीन रेल्वे सेवा सुरू करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत नांदेड–मुंबई वंदे भारत एक्सप्रेस अकोला मार्गे सुरू करून वाशीम आणि अकोला येथे अधिकृत थांबा देण्याची, नांदेड–छत्रपती संभाजीनगर/मनमाड मार्गे वाशीम–अकोला दररोज इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करण्याची, तसेच जनशताब्दी एक्सप्रेस (क्र. 12072/12071) हिंगोलीवरून वाशीमपर्यंत विस्तारण्याची महत्त्वाची मागणी करण्यात आली.
याशिवाय, वर्धा–नांदेड रेल्वे मार्गाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, मूर्तिजापूर–दारव्हा (यवतमाळ) रेल्वे मार्गाला विशेष प्रकल्पाचा दर्जा देऊन तातडीने मंजुरी द्यावी, वाशीम–बडनेरा रेल्वे मार्गाला मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच वाशीम–दिग्रस–माहूर–आदिलाबाद या नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी द्यावी, अशा महत्त्वाच्या मागण्याही निवेदनातून मांडण्यात आल्या.
प्रवाशांच्या दैनंदिन सोयी लक्षात घेऊन नांदेड–कुर्ला (गाडी क्रमांक 17665/66 व 17667/68) पुन्हा सुरू केल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे आभार व्यक्त करत, या गाडीच्या वेळापत्रकात प्रवाशांना सोयीस्कर बदल करण्याची तसेच कायमस्वरूपी रॅक उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
याचबरोबर नागपूर–कोल्हापूर (गाडी क्रमांक 11403/04) ही सध्या आठवड्यातून दोन दिवस धावणारी रेल्वे दररोज सुरू करावी, नांदेड–नागपूर दरम्यान दैनंदिन पॅसेंजर रेल्वे सुरू करावी, तसेच नांदेड–पुणे (वाशीम–अकोला मार्गे) नवीन दैनंदिन रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणीही खासदार देशमुख यांनी रेल्वे बोर्डाकडे केली.
खासदार संजय देशमुख यांनी सांगितले की, या सर्व मागण्या पूर्ण झाल्यास विदर्भ आणि मराठवाड्यातील लाखो नागरिकांना थेट लाभ मिळेल. विशेषतः विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी प्रवास अधिक सुलभ होईल. तसेच औद्योगिक गुंतवणूक, व्यापार आणि आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीदरम्यान रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांनी सादर करण्यात आलेल्या सर्व मागण्यांचा सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करण्यात येईल आणि संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे आश्वासन दिले.
विदर्भ–मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात असून, या बैठकीत मांडण्यात आलेल्या मागण्यांमुळे भविष्यात या भागातील रेल्वे सुविधांच्या विस्ताराला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा