गुटखा वाहतूक करणाऱ्यावर गोरेगाव पोलिसांची कारवाई; 20 हजारांचा मुद्देमाल जप्त
सहायक पोलीस निरीक्षक भिंगारे
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली दि. 22 जुलै : गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित सुगंधित गुटखा व तंबाखूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका किराणा दुकान चालकावर पोलिसांनी कारवाई करून 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (दि. 22 जुलै) रोजी सायंकाळी सुमारे 4.55 वाजता मौजे पळशी येथील स्मशानभूमीजवळ सार्वजनिक रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात मनोज शिवप्रसाद लदनिया (वय 48, व्यवसाय – किराणा दुकान चालक, रा. पळशी, ता. सेनगाव, जि. हिंगोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान आरोपीच्या ताब्यातून बिग पॅक केसरयुक्त विमल पान मसाल्याचे 40 पुडे, किंमत 19,200 रुपये तसेच व्ही-1 तंबाखूचे 40 पुडे, किंमत 800 रुपये, असा एकूण 20 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस नाईक राहुल वसंत मैंदकर यांच्या फिर्यादीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 189/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 चे कलम 123, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला आणि मानवी आरोग्यास अपायकारक असलेला सुगंधित गुटखा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवून वाहतूक करत असताना आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, स्थानिक नागरिकांमध्ये संबंधित व्यक्ती अनेक वर्षांपासून प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध व्यवहारात सहभागी असल्याची चर्चा आहे. मात्र, या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीच्या अवैध व्यवहारांची माहिती तपासल्यास आणखी मोठा मुद्देमाल किंवा इतर धागेदोरे समोर येण्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा