दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ उद्या हिंगोली जिल्हा बंद; वंचित बहुजन आघाडीचा शांततापूर्ण मोर्चा

दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ उद्या हिंगोली जिल्हा बंद; वंचित बहुजन आघाडीचा शांततापूर्ण मोर्चा

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
22 जुलै 2026 
हिंगोली | प्रतिनिधी
दिल्ली येथील जंतर-मंतर परिसरात विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीचार्ज, अश्रुधुराचा मारा आणि दडपशाहीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवार, दि. 23 जुलै 2026 रोजी हिंगोली जिल्हा बंदचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे.
यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी, हिंगोली यांना निवेदन सादर करण्यात आले असून, बंददरम्यान काढण्यात येणारा मोर्चा पूर्णपणे शांततापूर्ण राहणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
मोर्चाची सुरुवात संविधान चौकातून होऊन महात्मा गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्ग, जवाहर रोड, पोस्ट ऑफिस रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, इंदिरा गांधी चौक या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत संविधान कॉर्नर येथे समारोप होणार आहे.
दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित कारवाईचा निषेध नोंदविणे, लोकशाही हक्कांचे संरक्षण आणि विद्यार्थ्यांवरील दडपशाहीविरोधात आवाज उठविणे हा या आंदोलनाचा प्रमुख उद्देश असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.
**मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने आवश्यक सहकार्य करावे, अशी विनंतीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी शांतता राखून आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने