विवाहितेचा पाठलाग करून विनयभंग; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
'माझ्यासोबत राहा, नाहीतर नवऱ्यासह ठार मारतो'
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
02 जुलै, 2026
औंढा नागनाथ पोलिसांची कारवाई
औंढा नागनाथ, दि. २ जुलै : औंढा नागनाथ तालुक्यात कामानिमित्त वास्तव्यास असलेल्या २१ वर्षीय विवाहितेचा सातत्याने पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी तसेच तिला व तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील पीडित महिला आपल्या कुटुंबासह मागील वर्षभरापासून औंढा नागनाथ तालुक्यात कामानिमित्त वास्तव्यास आहे. शेतमजुरी करून तिचे कुटुंब उदरनिर्वाह करत आहे.
सोमवारी (२९ जून) दुपारच्या सुमारास महिला घरासमोर उभी असताना किरण पोले हा तेथे आला. त्याने महिलेशी जबरदस्तीने संवाद साधत, "तू मला फोन करत जा, मी बोलावेन तेव्हा आली पाहिजेस, माझ्यासोबत राहायला ये," अशी मागणी केली. मात्र महिलेने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.
त्यानंतर आरोपीने महिलेचा सातत्याने पाठलाग सुरू केला. महिला कामावर जात-येत असताना तो तिच्या मागे येत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकाराला कंटाळून महिलेने त्याला "माझा पाठलाग करू नको. मला दोन मुले आणि नवरा आहे. मी तुझ्यासोबत येणार नाही," असे स्पष्ट सांगितले.
यावर संतप्त झालेल्या आरोपीने, "तू तुझ्या नवऱ्याला सोडून दे. माझ्यासोबत आली नाहीस तर तुला आणि तुझ्या नवऱ्याला जिवे मारून टाकीन," अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
धमकीमुळे घाबरलेल्या महिलेने मंगळवारी (३० जून) औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी किरण पोले याच्याविरुद्ध विनयभंग, पाठलाग करणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राठोड, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मुकाडे, जमादार रविकांत हरकाळ हे प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा