रिसोड पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात ठाणेदारासह ९ पोलिसांना जन्मठेपवाशिम जिल्हा न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; १५ वर्षांनंतर बेग्या पवार कुटुंबाला न्याय

रिसोड पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात ठाणेदारासह ९ पोलिसांना जन्मठेप
वाशिम  जिल्हा  न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; १५ वर्षांनंतर बेग्या पवार कुटुंबाला
 न्याय

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
३ जुलै 2026
प्रतिनिधी : सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील बेग्या नैनू पवार यांच्या रिसोड पोलीस ठाण्याच्या कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणात वाशिम येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय देत तत्कालीन पोलीस निरीक्षकासह नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी २ जुलै रोजी हा निकाल दिला. या निर्णयामुळे राज्यातील पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
संशयावरून ताब्यात, अमानुष मारहाणीत मृत्यू
सरकारी पक्षाचे जिल्हा सरकारी वकील अॅड. श्रीराम काळू तसेच मयताच्या बाजूने काम पाहणारे अॅड. मनीष साकळे, अॅड. प्रताप नायक आणि अॅड. चेतन अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० मे २०११ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास रिसोड पोलिसांच्या पथकाने सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील बेग्या नैनू पवार आणि राजू शेषराव पवार यांना संशयाच्या आधारावर ताब्यात घेतले होते.
दोघांना चौकशीसाठी रिसोड पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीत बेग्या पवार यांचा मृत्यू झाला, तर राजू पवार गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. बेग्या पवार यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यवतमाळ येथे करण्यात आले.
कुटुंबीयांचा खुनाचा आरोप; सीआयडीकडे तपास
मयताच्या कुटुंबीयांनी बेग्या पवार यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नसताना पोलिसांनी त्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन मारहाण केल्याचा आणि त्यातून त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली.
यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला. तत्कालीन सीआयडी उपअधीक्षक अन्वर शेख यांनी रिसोड पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून जून २०११ मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला.
सीआयडीने सखोल तपास करून नऊ आरोपी पोलिसांविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या खटल्यात एकूण ४७ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने दोषी पोलिसांना शिक्षा सुनावली.
जन्मठेपेसह दंडाची शिक्षा
न्यायालयाने सर्व आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैद भोगावी लागणार आहे.
याशिवाय आरोपी माधव धांडे, शिवाजी खिल्लारी, नागोराव खांडके आणि वसंत जाधव यांना अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील विविध कलमांखाली तीन वर्षे व पाच वर्षांपर्यंतच्या सक्तमजुरीसह स्वतंत्र दंडाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
१५ वर्षांनंतर कुटुंबाला न्याय
या निकालानंतर बेग्या पवार यांची आई कलाबाई, वडील नैनू पवार आणि पत्नी संजीवनी पवार यांना तब्बल १५ वर्षांनंतर न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
सरकार पक्षाची बाजू प्रभावी
या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. श्रीराम काळू यांनी काम पाहिले. मयताच्या कुटुंबीयांच्या वतीने अॅड. मनीष साकळे यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. प्रताप नायक भगवतीकर आणि अॅड. चेतन अग्रवाल यांनी सहकार्य केले. तसेच वाशिम गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस निरीक्षक ममता अफुणे, रिसोडचे पोलीस कर्मचारी श्रृंगारे, अमर ठाकूर आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मीना पाथरकर यांनीही सहकार्य केले.
जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे
माधव धांडे (तत्कालीन पोलीस निरीक्षक)
मदन पवार
रमेश पवार
हिरालाल ताराम
शिवाजी खिल्लारी
अशोक वैद्य
वसंत जाधव
नागोराव खांडके
पंजाब पाटकर
ठळक बाबी
रिसोड पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात १५ वर्षांनी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल.
तत्कालीन ठाणेदारासह ९ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेप.
४७ साक्षीदारांच्या जबाबांनंतर न्यायालयाने दोष सिद्ध मानला.
खून आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कठोर शिक्षा.
निकालामुळे पोलीस दलात मोठी खळबळ.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने