भाचीच्या छेडछाडीच्या वादातून तरुणाचा खून; तिघांना जन्मठेप, १.६० लाखांचा दंड

भाचीच्या छेडछाडीच्या वादातून तरुणाचा खून; तिघांना जन्मठेप, १.६० लाखांचा दंड

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
 दि. ६ जुलै 2026
हिंगोली शहरातील तलाबकट्टा परिसरात भाचीच्या छेडछाडीच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ श्रीमती एस. एन. माने-गाडेकर यांनी तीन आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा आणि एकूण १ लाख ६० हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच दंडाच्या रकमेपैकी १ लाख रुपये मृताच्या आईला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
प्रकरणाची पार्श्वभूमी
या प्रकरणातील फिर्यादी शोभाबाई सखाराम राजे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. १८ एप्रिल २०२२ रोजी रात्री ९.३० ते ९.४५ वाजण्याच्या सुमारास हिंगोली शहरातील तलाबकट्टा परिसरातील मारोती मंदिराजवळ त्यांचा मुलगा शुभम सखाराम राजे याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. आरोपीच्या भाचीची छेडछाड केल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपींनी गुप्ती, लोखंडी रॉड आणि खंजिराने शुभमवर सपासप वार करून त्याची हत्या केली.
या घटनेप्रकरणी दि. १९ एप्रिल २०२२ रोजी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६६/२०२२ दाखल करण्यात आला.
तपासानंतर दोषारोपपत्र दाखल
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. पी. विठूबोने यांनी करून आरोपींविरुद्ध सखोल पुरावे गोळा केले. त्यानंतर सत्र खटला क्रमांक ९३/२०२२ अंतर्गत जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
या आरोपींना शिक्षा
न्यायालयाने खालील आरोपींना दोषी ठरविले :
बबलु उर्फ बाबा सुभाष धाबे (वय २३), रा. तलाबकट्टा, हिंगोली
संतोष उर्फ मोहन चिंतामणराव जोरेवार (वय २०), मूळ रा. वाशिम, ह.मु. तलाबकट्टा, हिंगोली
विशु उर्फ विश्वास संजय मेकवाल (वय २१), मूळ रा. पुसद, जि. यवतमाळ, ह.मु. तलाबकट्टा, हिंगोली
न्यायालयाचा निकाल
दि. ६ जुलै २०२५ रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ श्रीमती एस. एन. माने-गाडेकर यांनी तिन्ही आरोपींना भारतीय दंड संहिता कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व प्रत्येकी ५० हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.
याशिवाय आरोपी क्रमांक ३ विश्वास संजय मेकवाल याला कलम ३२४ अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड सुनावण्यात आला. दंड न भरल्यास अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षाही न्यायालयाने सुनावली आहे.
न्यायालयाने एकूण दंडाच्या रकमेपैकी १ लाख रुपये मृत शुभम राजे यांची आई शोभाबाई राजे यांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. तसेच फिर्यादी व जखमी साक्षीदार अजय सुभाष चोपडे यांना योग्य ती नुकसानभरपाई देण्याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (DALSA) यांना निर्देश दिले.
सरकार पक्षाची प्रभावी बाजू
या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील एन. एस. मुटकुळे यांनी प्रभावी युक्तिवाद करत न्यायालयासमोर एकूण १७ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. त्यांना सहायक सरकारी वकील एस. डी. कुटे आणि सविता एस. देशमुख-जाधव यांनी सहकार्य केले.
या प्रकरणात कोर्ट पैरवी पोलीस हवालदार एम. बी. गव्हाणे (पोलीस ठाणे, हिंगोली शहर) यांनीही महत्त्वाची भूमिका बजावत सरकार पक्षाला आवश्यक सहकार्य केले.
भाचीच्या छेडछाडीच्या कारणावरून झालेल्या वादातून घडलेल्या या खून प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेमुळे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांविरोधात कठोर संदेश गेल्याची चर्चा न्यायालयीन वर्तुळात होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने