वसमत पंचायत समितीतील कंत्राटी अभियंत्यावर लाचखोरीचा गुन्हा; पाच हजारांची मागणी केल्याप्रकरणी एसीबीची कारवाई
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. ८ (प्रतिनिधी) : वसमत पंचायत समितीतील कंत्राटी अभियंता गणेश बप्पासाहेब गुजर (वय ६१) याच्याविरुद्ध गाय गोठा योजनेच्या मंजूर अनुदानाचा दुसरा व तिसरा हप्ता मिळवून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे पंचायत समिती वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग, हिंगोली येथे १० जून २०२६ रोजी वसमत तालुक्यातील किन्होळा येथील ४१ वर्षीय तक्रारदाराने तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, गाय गोठा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या अनुदानाचा उर्वरित दुसरा व तिसरा हप्ता मिळण्यासाठी मोजमाप पुस्तिका (एम.बी.) लिहून त्यावर स्वाक्षरी करून पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्याच्या मोबदल्यात कंत्राटी अभियंता गणेश गुजर याने रु. ५,००० लाचेची मागणी केली होती.
तक्रारीची दखल घेत एसीबीने त्याच दिवशी शासकीय पंचांच्या उपस्थितीत लाच मागणीची पडताळणी केली. या पडताळणीत आरोपीने तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती एसीबीने दिली.
यानंतर २२ जून २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. मात्र, कारवाईदरम्यान आरोपीला संशय आल्याने त्याने तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे सापळ्याची कारवाई स्थगित करण्यात आली. त्यानंतर तक्रारदाराने अनेक वेळा आरोपीची प्रत्यक्ष भेट घेण्याचा तसेच दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपीने भेट टाळली आणि फोनही स्वीकारले नसल्याचे तपासात समोर आले.
त्यानंतरच्या चौकशीनंतर ८ जुलै २०२६ रोजी वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४४४/२०२६ नोंदविण्यात आला. आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपीच्या अंगझडतीमध्ये व्हिवो कंपनीचा मोबाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ५,१७१ रुपये रोख रक्कम मिळून आली. मोबाईलची तपासणी करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार तो जप्त करण्यात येणार आहे. तसेच आरोपीच्या राहत्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया परभणी येथील भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागामार्फत सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेश मलपिलू यांनी सापळा अधिकारी म्हणून केली. या कारवाईवर पोलीस उपअधीक्षक विकास घनवट यांनी पर्यवेक्षण केले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा