ज्ञानपर्वत निवासी गुरुकुलातून १५ वर्षीय विद्यार्थी बेपत्ता; अपहरणाचा संशय, गुन्हा दाखल

ज्ञानपर्वत निवासी गुरुकुलातून १५ वर्षीय विद्यार्थी बेपत्ता; अपहरणाचा संशय, गुन्हा दाखल
पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे 

महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली, दि. ८ जुलै : हिंगोली तालुक्यातील बळसोंड येथील ज्ञानपर्वत निवासी गुरुकुल या वसतिगृहातून १५ वर्षीय विद्यार्थी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फूस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी मुलाचा शोध सुरू केला आहे.
तक्रारदार ऋषीकेश भगवान गुंजकर (वय २५) हे ज्ञानपर्वत निवासी गुरुकुलाचे व्यवस्थापक व संचालक असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बजरंग सुरेश राठोड (वय १५ वर्षे ९ महिने, रा. दुर्गेसावंती, ता. जि. हिंगोली) हा विद्यार्थी ३ जुलै २०२६ रोजी गुरुकुलात दाखल झाला होता.
फिर्यादीनुसार, ५ जुलै रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तक्रारदार कामानिमित्त परभणी येथे गेले होते. त्यावेळी दुपारी सुमारे २ वाजता गुरुकुलातील शिक्षक अमोल तुकाराम देशमुख यांनी फोन करून बजरंग हा दुपारी १२ वाजल्यापासून कोणालाही काहीही न सांगता वसतिगृहातून बाहेर गेला असून अद्याप परतलेला नसल्याची माहिती दिली.
यानंतर तक्रारदारांनी मुलाचे वडील सुरेश विठ्ठल राठोड यांच्याशी संपर्क साधला. मात्र मुलगा घरी किंवा नातेवाईकांकडेही पोहोचला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तक्रारदार, मुलाचे वडील आणि संबंधितांनी हिंगोली बसस्थानक, रेल्वे स्थानक तसेच इतर परिसरात शोधमोहीम राबविली, मात्र मुलाचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
मुलगा कोणालाही काहीही न सांगता निघून गेला असून त्याला एखाद्या अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय व्यक्त करत हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला असून बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठी विविध पथके कार्यरत आहेत.
बेपत्ता मुलाचे वर्णन :
नाव : बजरंग सुरेश राठोड
वय : १५ वर्षे ९ महिने
उंची : सुमारे ५ फूट
रंग : काळा-सावळा
चेहरा : उभा
केस : काळे
भाषा : मराठी
शिक्षण : इयत्ता १० वी
अंगावरील कपडे : लाल रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट
दरम्यान, संबंधित मुलाबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास तातडीने हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने