परभणी येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची विभागीय बैठक १९ जुलै रोजी

परभणी  येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची विभागीय बैठक १९ जुलै रोजी

हिंगोली , दि. १७ जुलै : अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता वसमत-परभणी रोडवरील सुवर्णा लॉन्स येथे विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर प्रमुख उपस्थित म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
बैठकीस राष्ट्रीय सरचिटणीस राजू पाटील शिपालकर, प्रदेशाध्यक्ष पंडितरावजी तिडके, प्रदेश मुख्य कार्याध्यक्ष रामदास गिरे पाटील, प्रदेश मुख्य कार्याध्यक्षा रेखाताई मनिरे, प्रदेशाध्यक्ष (उद्योग विभाग) वैभव गोबाळे, प्रदेश उपाध्यक्ष अमरजीत सिंग कारला, प्रदेश सचिव बाळासाहेब कदम, प्रदेशाध्यक्ष (मीडिया) शिवा काळे पाटील, मराठवाडा विभागीय अध्यक्ष अनंत कचाले तसेच राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पृथ्वीराज सिंह पाटील खंडापूरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
बैठकीत विविध जनहिताच्या व संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील काही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा आरोप करत या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्याबाबत विचारविनिमय होणार आहे. तसेच हिंगोली जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषासंदर्भातील प्रश्न, जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्याचा मुद्दा आणि शासनाविरोधात जनहित याचिका दाखल करण्याबाबतही चर्चा केली जाणार आहे.
याशिवाय महावितरणच्या कारभाराविषयी नागरिक व शेतकऱ्यांच्या तक्रारी, विजेचा तुटवडा, शेतकऱ्यांना होणारा अपुरा वीजपुरवठा, डी.पी. उपलब्धतेतील विलंब तसेच कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर संघटनेची पुढील भूमिका निश्चित केली जाणार आहे. आरटीओ विभागाविरोधातील सुरू असलेल्या आंदोलनाचा आढावा घेऊन जनतेची कथित गैरकायदेशीर आर्थिक लूट रोखण्यासाठी जिल्हास्तरावर आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) व मंडळाधिकारी यांनी नियुक्तीच्या ठिकाणी वास्तव्यास राहावे, शासकीय इमारतींचा प्रभावी वापर व्हावा तसेच गावागावातील कथित बेकायदेशीर दारूविक्रीविरोधात महिलांच्या मागण्यांवर पुढील आंदोलनाची रणनीती निश्चित करण्यात येणार आहे.
या बैठकीस हिंगोली, परभणी, नांदेड तसेच मराठवाड्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, महिला प्रतिनिधी आणि भ्रष्टाचारविरोधी लढ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हिंगोली जिल्हाध्यक्ष बालाजी वानखेडे, परभणी जिल्हाध्यक्ष गणेशजी शिंदे, नांदेड जिल्हाध्यक्ष शंकर मावलगे, हिंगोली महिला जिल्हाध्यक्षा वंदनाताई थिटे तसेच संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने