जिल्हा परिषदेत २५ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या; समायोजनातून शिक्षकांच्याही तालुका बदल्या सीईओं गायकवाड यांचा दणका

 
जिल्हा परिषदेत २५ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या; समायोजनातून शिक्षकांच्याही तालुका बदल्या
सीईओंचा गायकवाड यांचा  दणका
17 जुलै 2026
हिंगोली | प्रतिनिधी
जिल्हा परिषदेत अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांचा मोठा निर्णय घेत मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी प्रशासनात खळबळ उडवून दिली आहे. तब्बल २५ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, या निर्णयामुळे वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांचे अवसान गळाले आहे.
आरोग्य, शिक्षण, बांधकाम, लघुसिंचन तसेच पंचायत समित्यांमधील वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ प्रशासन अधिकारी आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी या संवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बदल्यांमध्ये समावेश आहे. यातील काही कर्मचारी तब्बल आठ ते दहा वर्षांपासून एकाच तालुक्यात किंवा एकाच विभागात कार्यरत होते.
प्रशासनात गतिमानता, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेला चालना देण्याच्या उद्देशाने या बदल्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे, यापूर्वी बदल्यांवर राजकीय दबाव किंवा वैयक्तिक शिफारशींचा प्रभाव असल्याची चर्चा होत असे. मात्र यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सेवाज्येष्ठता, कामाचा आढावा आणि प्रशासकीय गरज या निकषांवर बदली यादी अंतिम केल्याचे समजते.
या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. अनेक वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत राहिल्यामुळे निर्माण झालेला एकसुरीपणा दूर होऊन नव्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल. त्यामुळे प्रशासन अधिक गतिमान होण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेतही अनेक बदल करण्यात आले आहेत. काही शिक्षकांना रिक्त पदांवर नियुक्ती देण्यात आली असून, अनेकांचे तालुके बदलले आहेत. त्यामुळे शिक्षकांनाही नवीन कार्यक्षेत्रात रुजू व्हावे लागणार आहे.
बदली झालेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांना तत्काळ नवीन ठिकाणी कार्यभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजात निश्चितच सकारात्मक बदल दिसून येतील, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
ठळक मुद्दे
२५ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या
८ ते १० वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्यांवर कारवाई
राजकीय दबावाऐवजी सेवाज्येष्ठता व कामगिरीला प्राधान्य
समायोजनातून अनेक शिक्षकांचेही तालुके बदलले
नवीन ठिकाणी तातडीने कार्यभार स्वीकारण्याचे आदेश
प्रशासनात पारदर्शकता व गतिमानता आणण्याचा सीईओंचा प्रयत्न

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने