शंकर तावडे आरोग्य सेवेतून कार्यमुक्त; जिल्हा परिषद सीईओंची मोठी कारवाई
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
३० जुलै 2026
हिंगोली | प्रतिनिधी : हिंगोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात जिल्हा व्यवस्थापन कार्यक्रम अधिकारी (DPM) म्हणून कार्यरत असलेले शंकर मारोतराव तावडे यांना आरोग्य विभागातून कार्यमुक्त करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विवेक गायकवाड यांनी केली असून, जिल्हा परिषद प्रशासनातील ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.
शंकर तावडे हे सन २०१४ पासून हिंगोली जिल्हा आरोग्य विभागात जिल्हा व्यवस्थापन कार्यक्रम अधिकारी (DPM) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात विविध कंत्राटी भरती प्रक्रियेबाबत अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. तसेच अनेक वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत असल्याने त्यांच्या कामकाजाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
सीईओ विवेक गायकवाड यांनी संबंधित प्रकरणाची पडताळणी केली असता, प्राप्त तक्रारी आणि उपलब्ध नोंदींच्या आधारे मागील जून महिन्यापासून शंकर तावडे यांना संबंधित पदावर नियुक्ती देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांना आरोग्य विभागातून कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती सीईओ विवेक गायकवाड यांनी महाराष्ट्र 24 न्यूजशी बोलताना दिली.
यावेळी सीईओ विवेक गायकवाड यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, जिल्हा परिषदेत कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी गैरप्रकार अथवा नियमबाह्य काम करत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व राखण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असेही त्यांनी नमूद केले.
जिल्हा परिषद प्रशासनाच्या या कारवाईमुळे आरोग्य विभागासह इतर विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही खळबळ उडाली असून, प्रशासन गैरप्रकारांविरोधात कठोर भूमिका घेत असल्याचे या निर्णयातून स्पष्ट झाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा