बैलगाड्यांना परावर्तक स्टिकर लावून अपघात रोखण्याचा उपक्रम; पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांची अभिनव मोहीम
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
१६ जुलै 2026
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी रस्ते सुरक्षा आणि अपघात प्रतिबंधाला प्राधान्य देत अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. वळणाचे रस्ते, अपघातप्रवण ठिकाणे आणि रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता असलेल्या मार्गांची पाहणी करून त्यांनी जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
रात्रीच्या वेळी बैलगाड्या सहज न दिसल्याने अनेकदा अपघात होतात. ही बाब लक्षात घेऊन चारचाकी वाहनांसह बैलगाड्यांवरही परावर्तक (रिफ्लेक्टिव्ह) स्टिकर लावण्याची मोहीम औंढा नागनाथ परिसरात राबविण्याचा संकल्प पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी केला आहे. या स्टिकरमुळे रात्री वाहनांच्या प्रकाशात बैलगाड्या दूरवरून स्पष्ट दिसणार असून अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
याशिवाय वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन, सुरक्षित वेग, वळणाच्या रस्त्यांवर आवश्यक ती खबरदारी तसेच रात्रीच्या प्रवासादरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. अपघात रोखण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनाही वेळोवेळी आवश्यक सूचना देऊन प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला जात आहे.
पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या या लोकहिताच्या उपक्रमाचे शेतकरी, बैलगाडी मालक तसेच वाहनचालकांकडून स्वागत होत असून रस्ते सुरक्षा वाढविण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा