मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते १३ शाळांना पुस्तक पेट्यांचे वाटप; जिल्ह्यातील ८७५ शाळांमध्ये उपक्रम राबविणार

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते १३ शाळांना पुस्तक पेट्यांचे वाटप; जिल्ह्यातील  ८७५ शाळांमध्ये उपक्रम राबविणार

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली, दि. 20/ऑगस्ट 2026 : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, त्यांना वाचनाची सवय लावणे आणि जिल्ह्यात व्यापक वाचन चळवळ रुजविणे या उद्देशाने जिल्हा परिषद हिंगोलीच्या वतीने अभिनव ‘पुस्तक पेटी’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते आज जिल्हा परिषदेत १३ शाळांना पुस्तक पेट्यांचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सर्व ८७५ शाळांमध्ये हा उपक्रम टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असून, एकही विद्यार्थी या उपक्रमापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) समृद्धी दिवाणे, पुस्तक पेटी उपक्रमाचे प्रणेते अभिजीत जोंधळे, अभिजित लोहिया, शिक्षणाधिकारी मंजुश्री कल्लेवाड, उपशिक्षणाधिकारी आशावरी काळे, शिक्षणाधिकारी माध्यमिक विपुण भगत यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वाचनातून अधिकारी, उद्योजक घडावेत
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी सांगितले की, शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागून त्यांच्यात उत्तम वाचक निर्माण झाले पाहिजेत. वाचनातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणि बौद्धिक क्षमतेत वाढ होऊन भविष्यात उच्च पदांवर कार्य करणारे अधिकारी तसेच यशस्वी उद्योजक निर्माण झाले पाहिजेत.
जिल्हा परिषद अंतर्गत ८७५ शाळा असून, आजच्या कार्यक्रमात १३ शाळांना पुस्तक पेट्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अभिनव उपक्रमापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची संबंधितांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
नागरिकांनी जुनी पुस्तके दान करावीत
विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील पुस्तके सहज उपलब्ध व्हावीत, यासाठी जिल्ह्यात ‘बुक डोनेशन कॅम्प’ आयोजित करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या घरी वाचून झालेली तसेच संग्रहित केलेली चांगल्या स्थितीतील पुस्तके या कॅम्पमध्ये जमा करावीत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी केले.
नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पुस्तके दान केल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध विषयांचे साहित्य वाचनासाठी उपलब्ध होईल. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जास्तीत जास्त पुस्तके दान करावीत, असे आवाहन करण्यात आले.
६० हजार विद्यार्थ्यांची सहामाही सराव परीक्षा
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी आणि त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करता यावे, यासाठी जिल्ह्यात सहामाही सराव परीक्षा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत तब्बल ६० हजार विद्यार्थ्यांची सकाळी १० ते १२ या वेळेत परीक्षा घेण्यात येणार आहे.
या सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळून त्यांच्यात स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होईल. भविष्यात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्ता प्राप्त करून विद्यार्थ्यांनी सर्वोच्च यश संपादन करावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
३१ शाळांमध्ये ग्रंथालय उपक्रम
जिल्ह्यातील ३१ शाळांमध्ये ग्रंथालयाशी संबंधित उपक्रम सुरू करण्यात येत आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा भाषिक पाया मजबूत करण्यासाठी १२ ऑगस्टपासून प्रत्येक शाळेत मराठी-इंग्रजी बाराखडी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी केले.
जलसंधारण दिनानिमित्त जनजागृती
मृद व जलसंधारणाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी केले.
‘पुस्तक पेटी’त विद्यार्थ्यांच्या आवडीची पुस्तके
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) समृद्धी दिवाणे यांनी सांगितले की, पुस्तक पेटी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांना वाचनाची प्रेरणा मिळेल. या माध्यमातून जिल्ह्यात वाचन चळवळ निर्माण होऊन भविष्यात उच्च पदांवर काम करणारे अधिकारी घडतील.
मुलांच्या आवडीनुसार पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आवडतील अशा विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश एका पुस्तक पेटीत करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या वयानुसार आणि आवडीनुसार पुस्तके वाचण्याची संधी मिळणार आहे.
२०० व्या पुस्तक पेटीचे वितरण
पुस्तक पेटी उपक्रमाचे प्रणेते अभिजीत जोंधळे यांनी सांगितले की, आज २०० व्या पुस्तक पेटीचे वितरण करण्यात आले. अंबाजोगाई येथून सुरू झालेला हा उपक्रम परळी, लातूर आणि आता हिंगोली जिल्ह्यातही पोहोचला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम व्यापक स्वरूपात राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
सोशल मीडियाच्या आकर्षणातून विद्यार्थ्यांना पुस्तकांकडे वळविण्याचा प्रयत्न
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी सांगितले की, सध्याच्या काळात मुलांचे आकर्षण इन्स्टाग्राम, फेसबुक, सोशल मीडिया आणि ऑडिओ क्लिप्सकडे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना पुन्हा पुस्तकांकडे वळविणे आणि त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करणे ही काळाची गरज आहे.
पुस्तक पेटी उपक्रमामुळे निश्चितच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होऊन उत्तम वाचक घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वाचनामुळे ज्ञान आणि आत्मविश्वास वाढतो
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी वाचनाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, वाचनाची आवड निर्माण झाल्यास माणूस ज्ञानी, बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी बनतो. वाचनामुळे ज्ञानाचा विस्तार होण्यासोबतच मनाला शांती मिळते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी वाचन संस्कृती रुजविणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्ह्यातील प्रत्येक शाळेपर्यंत पुस्तक पेटी पोहोचवून विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षक, पालक, नागरिक आणि सामाजिक संस्थांनी या वाचन चळवळीत सहभागी होऊन विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने