जलसंधारण दिनानिमित्त शुक्रवारी हिंगोलीत महावॉकेथॉन
‘महावॉकेथॉन २०२६ फॉर वॉटर’मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
20 ऑगस्ट 2026
हिंगोली : जलसंधारण दिनानिमित्त हिंगोली शहरात शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता महावॉकेथॉन २०२६ फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. जलसंधारणाचे महत्त्व, पाण्याचे संवर्धन आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सुमारे ३ किलोमीटर अंतराची ही महावॉकेथॉन शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून महावॉकेथॉनला सुरुवात होईल. त्यानंतर जि.प. प्रशाला मैदान, नवीन न्यायालय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड नाका, इंदिरा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, निर्मल कॅफे, पाण्याची टाकी आणि पुन्हा जिल्हा परिषद प्रशाला मैदान असा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
पाण्याच्या संवर्धनाचा संदेश
पाण्याचे वाढते संकट लक्षात घेता जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन, भूजलपातळी वाढविणे तसेच पाण्याचा काटकसरीने वापर याबाबत जनजागृती करणे काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या महावॉकेथॉनच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत ‘पाणी वाचवा, भविष्यातील पिढ्या वाचवा’ हा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या उपक्रमात विद्यार्थी, युवक, महिला, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड आणि जिल्हा जलसंधारण अधिकारी विनोद निर्वळ यांनी नागरिकांना या महावॉकेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. जलसंधारणाचा संदेश जनमानसात रुजविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून, हिंगोलीकरांनी एकत्र येत पाण्याच्या संवर्धनासाठी आपली बांधिलकी व्यक्त करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
उपक्रम : महावॉकेथॉन २०२६ फॉर वॉटर
दिनांक : शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६
वेळ : सकाळी ६ वाजता
अंतर : ३ किलोमीटर
प्रारंभस्थळ : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा
समारोप : जिल्हा परिषद प्रशाला मैदान
टिप्पणी पोस्ट करा