हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात अस्वच्छ बाथरूममुळे दुर्गंधी; कर्मचाऱ्यांसह नागरिक त्रस्त
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
१८ ऑगस्ट २०२६
हिंगोली : जिल्हाधिकारी कार्यालयासारख्या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयातील बाथरूममध्ये पाण्याची उपलब्धता नसल्याने आणि स्वच्छतेअभावी परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याचे चित्र समोर आले आहे. कार्यालयातील विविध बाथरूमच्या अस्वच्छतेमुळे कर्मचारी तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
जिल्हाधिकारी यांच्या केबिनच्या बाजूला असलेल्या पहिल्या मजल्यावरील बाथरूममधूनही दुर्गंधी येत असल्याची तक्रार आहे. तसेच तळमजल्यावरील बाथरूमची परिस्थितीही समाधानकारक नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पाण्याअभावी बाथरूमची नियमित स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधीचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
दिवसभर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी यांच्यासह विविध विभागातील अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक व अभ्यागत जिल्हाधिकारी कार्यालयात येत असतात. अशा ठिकाणी स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि पाण्याची व्यवस्था सुरळीत असणे आवश्यक असताना, अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, दुर्गंधीचा त्रास असह्य झाल्याने काही कर्मचारी तोंडाला कपडा बांधून बाथरूममध्ये जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे कार्यालयातील स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वच्छतागृहांची तातडीने स्वच्छता करून पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी, तसेच स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या संबंधित कंत्राटदारावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
शासकीय कार्यालयात दररोज शेकडो नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनेही या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा