हिंगोलीची राज्यात अव्वल कामगिरी; मतदार नोंदणी अर्जांच्या संगणकीकरणात ८९.९७ टक्के प्रगती

हिंगोलीची राज्यात अव्वल कामगिरी; मतदार नोंदणी अर्जांच्या संगणकीकरणात ८९.९७ टक्के प्रगती

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता 
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
02ऑगस्ट 2026 
हिंगोली : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण अभियानांतर्गत सुरू असलेल्या मतदार नोंदणी अर्जांच्या संगणकीकरणाच्या प्रक्रियेत हिंगोली जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी नोंदवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८९.९७ टक्के अर्जांचे संगणकीकरण पूर्ण करण्यात आले असून, निवडणूक यंत्रणेच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीला यश मिळाल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे विशेष अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये अधिकारी, कर्मचारी तसेच बूथस्तरीय अधिकाऱ्यांनी समन्वय साधून अर्जांची तपासणी व संगणकीकरणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली आहे.
मतदारसंघनिहाय आकडेवारीनुसार, वसमत विधानसभा मतदारसंघात ९०.२८ टक्के, हिंगोली विधानसभा मतदारसंघात ८९.२२ टक्के, तर कळमनुरी विधानसभा मतदारसंघात ८०.४४ टक्के अर्जांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहे. सर्व मतदारसंघांतील सातत्यपूर्ण प्रगतीमुळे जिल्ह्याने राज्यातील इतर जिल्ह्यांना मागे टाकत अव्वल स्थान मिळविले आहे.
मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या या विशेष अभियानाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून, उर्वरित अर्जांचे संगणकीकरणही निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी निवडणूक प्रशासनाने गती वाढविली आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्याच्या निवडणूक यंत्रणेचे राज्यभरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने