हिंगोली न्यायालयात लिफ्टमध्ये वयोवृद्ध महिलेसह चार नागरिक अडकले; दहा मिनिटे जीव गुदमरला, न्यायालय परिसरात एकच खळबळ
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
01 ऑगस्ट 2026
: हिंगोली येथील नवीन जिल्हा न्यायालयाच्या इमारतीतील लिफ्ट अचानक बंद पडल्याने एका वयोवृद्ध महिलेसह चार नागरिक तब्बल दहा मिनिटे लिफ्टमध्ये अडकून पडल्याची घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे न्यायालय परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयीन कामकाजासाठी तळमजल्यावरून तिसऱ्या मजल्याकडे जाण्यासाठी संबंधित नागरिक लिफ्ट क्रमांक तीनमधून प्रवास करत होते. त्यामध्ये एका वयोवृद्ध महिलेचाही समावेश होता. मात्र, लिफ्ट अचानक बंद पडल्याने सर्वजण आतमध्ये अडकून पडले. सुमारे दहा मिनिटे लिफ्ट बंद राहिल्याने आत अडकलेल्या वयोवृद्ध महिलेचा जीव गुदमरू लागला.
लिफ्टमधून सायरनचा आवाज येऊ लागल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या वकिलांनी व नागरिकांनी धाव घेतली. काही काळ आरडाओरड व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर तांत्रिक कर्मचाऱ्यांनी लिफ्टचे दार उघडून अडकलेल्या महिला व अन्य नागरिकांची सुरक्षित सुटका केली.
या प्रकारामुळे न्यायालयात आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेषतः वयोवृद्ध नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. न्यायालयासारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक इमारतीतील लिफ्ट वारंवार बिघडत असल्यास त्याची नियमित तपासणी व देखभाल होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, न्यायालयातील लिफ्ट क्रमांक एकही बंद अवस्थेत आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे न्यायालय प्रशासनाने लिफ्टची तातडीने तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी वकील व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा