लाभार्थ्यांच्या घरी 30 सप्टेंबरला ‘आशीर्वादाचा दिवा’शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी प्रशासन साधणार थेट संवाद; कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई, ‘काम नाही, वेतन नाही’ तत्त्वाची कठोर अंमलबजावणी

लाभार्थ्यांच्या घरी 30 सप्टेंबरला ‘आशीर्वादाचा दिवा’
शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी प्रशासन साधणार थेट संवाद; कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई, ‘काम नाही, वेतन नाही’ तत्त्वाची कठोर अंमलबजावणी

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली, दि. 29 : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांना गती देण्यासोबतच शासकीय योजनांचा लाभ घेतलेल्या प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत प्रशासनाने प्रत्यक्ष पोहोचावे, यासाठी 30 सप्टेंबर रोजी लाभार्थ्यांच्या घरी ‘आशीर्वादाचा दिवा’ लावण्यात येणार आहे. संबंधित विभागांनी लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन ही कार्यवाही नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावी, अशा स्पष्ट सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात सेवा संकल्प अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, प्रलंबित प्रकरणे, स्वच्छता अभियान, ग्रामविकास तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
लाभार्थ्यांच्या घरी जाऊन प्रशासनाचा उपक्रम
जिल्ह्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला असून, या योजनांचा प्रत्यक्ष लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी प्रशासनाकडून लाभार्थ्यांच्या घरी भेटी देण्यात येणार आहेत. 30 सप्टेंबर रोजी संबंधित अधिकारी व कर्मचारी लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ‘आशीर्वादाचा दिवा’ लावतील. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित विभागांनी पूर्वनियोजन करून कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
दत्तक गावांच्या विकासकामांवर अधिकाऱ्यांचे लक्ष
जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांनी त्यांना नेमून दिलेल्या दत्तक गावांना आठवड्यातून किमान एक दिवस भेट देऊन विकासकामे आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घ्यावा, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले. केवळ कार्यालयीन पातळीवरून आढावा न घेता प्रत्यक्ष गावपातळीवर जाऊन कामांची पाहणी करण्यावर भर देण्यात आला.
17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान ‘स्वच्छ सेवा आकलन’
जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ‘स्वच्छ सेवा आकलन’ उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. 2 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये विशेष स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणांना देण्यात आले.
यासोबतच प्रत्येक शाळा आणि अंगणवाडीमध्ये परसबाग तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये तसेच बालकांमध्ये स्वच्छता, पोषण आणि पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
प्रत्येक कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कक्ष
प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी प्रत्येक कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकारी आणि तालुका तसेच ग्रामस्तरावरील यंत्रणांमध्ये समन्वय वाढविण्यावर भर देण्यात आला.
तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर महिला बचत गटांची स्थापना करण्याचे निर्देश देण्यात आले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून विविध उपक्रमांना चालना देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
कामचुकार कर्मचाऱ्यांची गय नाही
प्रशासकीय कामकाजात निष्काळजीपणा करणाऱ्या आणि कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी कठोर भूमिका घेतली आहे. काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले असून ‘काम नाही, वेतन नाही’ या तत्त्वाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले.
“यापुढे कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. संबंधितांविरुद्ध नियमानुसार प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल,” असे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे जिल्हा परिषद आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत आणि प्रभावीपणे पार पाडण्याच्या दृष्टीने प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेतली आहे.
प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश
बैठकीत ‘आपले सरकार’ पोर्टल, आयुक्तालय स्तरावरील मुद्दे, पीजी पोर्टल तसेच शासन स्तरावरील प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या तक्रारी आणि विविध प्रशासकीय प्रकरणे विनाकारण प्रलंबित ठेवू नयेत, तसेच संबंधित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीचाही आढावा
बैठकीत आयुष्मान भारत व वय वंदना कार्ड, तसेच राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके यांसह आरोग्य क्षेत्रातील विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुधारणा करून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
अधिकारी उपस्थित; गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी
या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) समृद्धी दिवाणे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गडापोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) विजय बोराटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मंजुश्री कल्लेवाड, शिक्षणाधिकारी (योजना) संदीप सोनटक्के, कार्यकारी अभियंता राजू नरवाडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी बुचाले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

Post a Comment

أحدث أقدم