चारही सोमवारी औंढ्यात शिवभक्तांचा जनसागर लाखो भाविकांची मांदियाळी . मध्यप्रदेश गुजरात राज्यातील भाविकांना सुलभ दर्शन

चारही सोमवारी औंढ्यात शिवभक्तांचा जनसागर
लाखो भाविकांनी घेतले दर्शन 
‘हर हर महादेव’, ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषाने औंढा नगरी दुमदुमली; 

मध्यप्रदेश  गुजरातसह परभणी, बीड, लातूर, नांदेडसह विविध जिल्ह्यांतून भाविक दाखल

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
८ सप्टेंबर 2026 
औंढा नागनाथ : श्रावण महिन्यातील चारही सोमवारी आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ प्रभूच्या दर्शनासाठी औंढा नागनाथ येथे लाखो शिवभक्तांची मांदियाळी जमली. श्रावणातील प्रत्येक सोमवारी रविवारी मध्यरात्रीपासूनच विविध राज्यांसह जिल्ह्यांमधून भाविक औंढा नगरीत दाखल होऊ लागल्याने मंदिर परिसर तसेच शहरातील प्रमुख मार्ग गर्दीने फुलून गेले होते. ‘हर हर महादेव’ आणि ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषाने संपूर्ण औंढा नगरी दिवसभर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली.
श्रावणातील चारही सोमवार हे शिवभक्तांसाठी विशेष महत्त्वाचे मानले जात असल्याने यंदाही भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. नागनाथ प्रभूच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रविवारी रात्रीपासूनच भाविक शहरात दाखल होत असल्याने मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती.
मध्यरात्रीनंतर दोन वाजता मंदिर दर्शनासाठी खुले शेवटच्या सोमवारी 
देवस्थानचे सुरक्षा गार्ड प्रमुख बबन सोनुने यांनी नागनाथ प्रभूची महापूजा व दुग्धाभिषेक केल्यानंतर मध्यरात्रीनंतर दोन वाजता मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंदिर खुले होण्यापूर्वीपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. पहाट उजाडताच भाविकांची संख्या आणखी वाढली. अनेक भाविकांनी तासनतास रांगेत उभे राहून नागनाथ प्रभूचे दर्शन घेतले.
मध्य प्रदेश गुजरातसह विविध जिल्ह्यांतून भाविक दाखल
नागनाथ प्रभूच्या दर्शनासाठी इंदूर व गुजरात राज्यासह परभणी, बीड, लातूर, नांदेड, अकोला, वाशीम, यवतमाळ, माहूर, जिंतूर, हिंगोली, पुसद तसेच औंढा नागनाथ तालुका व परिसरातील विविध गावांतून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. काही भाविकांनी अनवाणी पायी प्रवास करत नागनाथ प्रभूच्या चरणी हजेरी लावली.
विविध भागांतून आलेल्या दिंड्या आणि कावड यात्रांमुळे औंढा नगरीतील वातावरण अधिकच भक्तिमय झाले होते. हातात भगवे ध्वज, खांद्यावर कावड आणि मुखी ‘हर हर महादेव’चा जयघोष करत भाविक मंदिराकडे मार्गक्रमण करताना दिसून आले.
देवस्थानकडून भाविकांसाठी खिचडी व पाण्याची व्यवस्था
नागनाथ प्रभूचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी मंदिर परिसरात विविध धार्मिक विधी केले. मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने देवस्थानच्या वतीने साबुदाणा खिचडी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभर भाविकांचा ओघ कायम राहिल्याने मंदिर परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.
चाळीस पोलीस पाटलांचा बंदोबस्तात सहभाग
श्रावणातील चारही सोमवारी होणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन औंढा नागनाथ मंदिर व परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने बंदोबस्ताची आखणी केली.
पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांच्या पुढाकारातून बंदोबस्तासाठी सुमारे चाळीस पोलीस पाटलांचा सहभाग घेण्यात आला. मंदिर परिसर, दर्शन रांगा, प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली.
सुलभ दर्शनासाठी ठिकठिकाणी पोलिसांची नियुक्ती
पोलीस अधीक्षक श्रनिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली औंढा नागनाथ येथे श्रावणातील चारही सोमवारी भाविकांना सुलभ व सुरक्षित दर्शन मिळावे यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाविकांची गर्दी वाढत असताना रांगा शिस्तबद्ध ठेवणे, वाहतूक सुरळीत करणे आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम पोलिसांकडून करण्यात आले.
श्रावणातील चारही सोमवारी औंढा नागनाथ येथे झालेली भाविकांची गर्दी ही नागनाथ प्रभूवरील शिवभक्तांची असलेली अपार श्रद्धा आणि भक्तीचे दर्शन घडवणारी ठरली. दिवसभर घुमणाऱ्या ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण औंढा नगरी भक्तिरसात रंगून गेली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने