चोरीच्या संशयातून तरुणाचा खून; हिंगोलीत तिघांना ठोकल्या बेड्या
पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे
भंगार दुकानातील पैसे व भंगार चोरी केल्याच्या संशयावरून शेख शब्बीर यांचा खून हिंगोली ग्रामीण पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
15 सप्टेंबर 2026
हिंगोली : भंगार दुकानातील पैसे व भंगार चोरी केल्याच्या संशयातून एका तरुणाला मारहाण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना हिंगोली शहरालगत उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिसांनी तत्परतेने तपासाची चक्रे फिरवत सौरभ पत्रे, नितीन कोल्हे आणि शिवदास घोडे या तिघांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मयताची ओळख शेख शब्बीर शेख रफीक (वय 34, रा. आझम कॉलनी, हिंगोली) अशी झाली आहे. याप्रकरणी मयताचा भाऊ शेख शारुख शेख रफिक (वय 32, रा. महादेववाडी, हिंगोली) यांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात तोंडी फिर्याद दिली.
चोरीच्या संशयातून मारहाण
पोलिसांच्या प्रथमखबरीतील माहितीनुसार, दि. 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेपासून दि. 14 सप्टेंबर रोजी सकाळी 7.50 वाजेपर्यंतच्या कालावधीत अकोला बायपास ते गारमाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर, आर. केज. श्रीरामनगरच्या उत्तरेस सुमारे आठ किलोमीटर अंतरावर, बीट क्रमांक 02 परिसरात ही घटना घडली.
आरोपी क्रमांक एकच्या भंगार दुकानातील गल्ल्यातील पैसे तसेच भंगार चोरी केल्याचा शेख शब्बीर यांच्यावर संशय होता. याच संशयातून आरोपींनी संगणमत करून त्यांना मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या मारहाणीत शेख शब्बीर यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.
तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा
या प्रकरणी सौरभ पत्रे, नितीन कोल्हे आणि शिवदास घोडे (सर्व रा. हिंगोली) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1), 140 (1) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग देत तिन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेत अटक केली आहे.
मध्यरात्री गुन्हा दाखल
या प्रकरणी दि. 15 सप्टेंबर रोजी रात्री 12.47 वाजता हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्टेशन डायरीमध्ये क्र. 05/2026 अशी नोंद करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान तिघांना अटक करण्यात आली असून, खुनामागील नेमका घटनाक्रम, मारहाणीचे कारण, आरोपींची भूमिका तसेच चोरीच्या संशयासंदर्भातील वस्तुस्थिती याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीषकुमार वाघ, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे आणि पोलीस उपनिरीक्षक राहुल घुले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे यांनी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल घुले करीत आहेत.
إرسال تعليق