दारू पिऊन पत्नी, वयोवृद्धांना त्रास देणाऱ्यांची गय नाही!
दारू पिणाऱ्या वाहनचालकांचेही अवसान गळाले
दोन महिन्यांत शेकडो कारवाया; पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या पथकाची बेधडक मोहीम
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
15 सप्टेंबर 2026
औंढा नागनाथ प्रतिनिधी : दारू पिऊन पत्नीला त्रास देणे, वयोवृद्ध नागरिकांशी गैरवर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणे आणि मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्यांविरोधात औंढा नागनाथ पोलिसांनी आता कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. दारू पिऊन कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिल्याने दारुड्यांचे अक्षरशः अवसान गळाले आहे.
औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून दारूच्या नशेत कुटुंबीयांना त्रास देणे, पत्नीशी वाद घालणे, वयोवृद्ध नागरिकांना शिवीगाळ करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यामुळे अनेक महिला आणि वयोवृद्ध नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रारी केल्या.
या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक श्रनिक लोढा यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथकाची नियुक्ती करण्यात आली. या पथकाने दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांसह मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करून कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे.
दारूच्या नशेत वाहन चालवून स्वतःसह इतरांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवरही पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांच्या अचानक कारवाईमुळे ‘दारू पिऊन गाडी चालवू, कोण काय करणार?’ या मानसिकतेला चांगलाच लगाम बसला आहे.
रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्यांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जात असल्याने वाहनचालकांमध्ये पोलिसांची चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे.
दोन महिन्यांत शेकडो कारवाया
गेल्या दोन महिन्यांत पोलिसांनी शेकडो कारवाया केल्याने दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पत्नीला त्रास देणे, घरात वाद घालणे, वयोवृद्ध नागरिकांना त्रास देणे, सार्वजनिक शांतता भंग करणे आणि मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे अशा प्रकारांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
दारूच्या नशेत केलेल्या किरकोळ वादातून अनेकदा गंभीर घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारांना सुरुवातीलाच आळा घालण्याच्या दृष्टीने पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली आहे.
महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना दिलासा
दारूच्या नशेत पतीकडून होणारा त्रास सहन करणाऱ्या महिला तसेच वयोवृद्ध नागरिकांसाठी पोलिसांची ही मोहीम दिलासादायक ठरत आहे. घरगुती वादाला कंटाळलेल्या महिलांनी आणि त्रासाला सामोरे जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणे, पत्नी किंवा कुटुंबीयांना त्रास देणे, वयोवृद्ध नागरिकांशी गैरवर्तन करणे अथवा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी पोलिसांची भूमिका आहे.
पोलीस अधीक्षक श्रनिक लोढा यांच्या आदेशाने आणि पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या धडक मोहिमेमुळे औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूच्या नशेत उपद्रव करणाऱ्यांवर चांगलाच वचक निर्माण झाला आहे.
‘दारू पिऊन धिंगाणा घालाल तर पोलिसांचा दंडासह दणका ठरलेलाच!’ अशा कडक कारवाईमुळे दारुड्यांचे अवसान गळाले असून, औंढा नागनाथ पोलिसांची ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे.
إرسال تعليق