हिंगोलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!२३ आरोपींवर गुन्हा दाखल दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश

हिंगोलीत  जुगार अड्ड्यावर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!
२३ आरोपींवर गुन्हा दाखल
  दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
07 सप्टेंबर 2026 
हिंगोली | प्रतिनिधी
हिंगोली शहरातील एन.टी.सी. परिसरात सुरू असलेल्या एका उच्चभ्रू जुगार अड्ड्यावर विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकासह हिंगोली शहर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, कार, आठ दुचाकी, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १८ लाख ४७ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सुरुवातीला १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आणखी पाच जणांचा सहभाग निष्पन्न झाल्याने एकूण २३ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास एन.टी.सी. परिसरातील ‘दोस्ती मित्र मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट’जवळ असलेल्या अजू उर्फ अजय नागरे यांच्या कॉम्प्लेक्समधील पत्र्याच्या गाळ्यात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने आणि हिंगोली शहर पोलिसांनी संयुक्तपणे घटनास्थळी धाड टाकली.
छाप्यावेळी गाळ्यामध्ये ‘झन्ना-मन्ना’ नावाचा जुगार सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तेथील रोख रक्कम आणि वाहने ताब्यात घेतली. कारवाईदरम्यान २ लाख १६ हजार २० रुपये रोख, एक कार, आठ मोटारसायकली, १५ मोबाईल फोन तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १८ लाख ४७ हजार २० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासात आणखी पाच जणांची नावे समोर
या प्रकरणाचा तपास सुरू असताना दोस्ती मित्र मंडळ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अजिंक्य उर्फ अज्जू सुदामराव नागरे, उपाध्यक्ष चेतन सुदामराव नागरे, सचिव गोपाल दिलीपराव बांगर, खनिजदार शेख गौस शेख पिरण आणि व्यवस्थापक गजानन विलासराव सांगळे यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर या पाच जणांनाही गुन्ह्यात आरोपी करण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणातील एकूण आरोपींमध्ये दोन पोलीस कर्मचारी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांची अधिकृत नावे, पदे आणि त्यांच्यावरील नेमके आरोप याबाबत अधिकृत माहिती स्पष्ट होणे बाकी आहे. त्यामुळे या बाबीची अधिकृत पुष्टी होणे आवश्यक आहे.
१८ आरोपींविरुद्ध गुन्हा; पुढे संख्या २३ वर
सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के यांच्या फिर्यादीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात अब्दुल जावेद अब्दुल हमीद, निनाजी दशरथ कांडेलकर, विनोद दत्तराव पांढरे, फारुख बेग खालीद बेग, निलेश पंडित देशमुख, दिनकर लिंबाजी बांगर, मदनलाल गंगाप्रसाद जैस्वाल, गजानन सोपान गिते, मनोज विश्वनाथ गायकवाड, सुनील सुदाम लोखंडे, संतोष बळीराम कांदे, नागोराव जनार्दन काळे, शिवाजी राजाराम कठारे, आकाश कैलास तारे, धनाजी रामकिशन दहातोंडे, सतीश नामदेवराव मुसळे, नसीर खान नवाज खान आणि विठ्ठल परसराम काळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तपासात आणखी पाच जणांचा सहभाग निष्पन्न झाल्याने आरोपींची संख्या २३ झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हिंगोली शहर पोलिसांकडून सुरू आहे.
विशेष पथकाची संयुक्त कारवाई
ही कारवाई पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर, सहायक पोलिस निरीक्षक ए.एस. बनसोडे, विशेष पोलिस महानिरीक्षक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक पी.व्ही. इंगळे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गिरी, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये पोलिस अंमलदार शेख अमजद, गोपीनाथ घुगे, आकाश बोथीकर, बाबासाहेब कांबळे, शेख आवेज, दिलीप लेकुळे यांच्यासह पोलिस पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
जप्त मुद्देमाल एक नजर
रोख रक्कम : २ लाख १६ हजार २० रुपये
कार : १
मोटारसायकली : ८
मोबाईल फोन : १५
जुगाराचे साहित्य : पोलिसांकडून जप्त
एकूण किंमत : १८ लाख ४७ हजार २० रुपये
कारवाईने खळबळ
एन.टी.सी. परिसरासारख्या शहरातील महत्त्वाच्या भागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर विशेष पोलिस पथकाने केलेल्या या कारवाईमुळे हिंगोली शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे तपासाची व्याप्ती वाढत असून, जुगार अड्ड्याच्या संचालनामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध जुगार अड्ड्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

أحدث أقدم