पीडित कुटुंबाच्या पाठीशी जिल्हा प्रशासन; जिल्हाधिकाऱ्यांची आखाडा बाळापूर येथे भेट

पीडित कुटुंबाच्या पाठीशी जिल्हा प्रशासन; जिल्हाधिकाऱ्यांची आखाडा बाळापूर येथे भेट

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली, दि. २५ : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आखाडा बाळापूर येथील ॲट्रॉसिटी प्रकरणातील मयत पंजाबराव मोरे यांच्या कुटुंबीयांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. या भेटीदरम्यान कुटुंबीयांना भेडसावणाऱ्या अडचणी, शासनाकडून मिळणारी मदत तसेच सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती घेतली.
पंजाबराव मोरे यांच्या निधनामुळे कुटुंबावर आलेल्या परिस्थितीची माहिती घेत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला. प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ आणि कायद्यानुसार मिळणाऱ्या मदतीबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. जिल्हा प्रशासन पीडित कुटुंबाच्या पाठीशी असून आवश्यक त्या शासकीय मदतीसाठी प्रशासनाकडून कार्यवाही केली जाईल, असा धीर त्यांनी कुटुंबीयांना दिला.
अर्थसहाय्याच्या प्रक्रियेची माहिती
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पीडित कुटुंबाला शासनाकडून मिळणाऱ्या अर्थसहाय्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पात्रतेनुसार कुटुंबाला मिळणाऱ्या मदतीची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि संबंधित विभागाकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा त्यांनी आढावा घेतला.
तसेच पीडित कुटुंबातील पात्र सदस्याला शासकीय नोकरी देण्याबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीचीही त्यांनी माहिती घेतली. यासंदर्भातील शासकीय नियम व प्रक्रियेप्रमाणे आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरक्षेबाबत प्रशासन सतर्क
पीडित कुटुंबाच्या सुरक्षिततेबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष विचारपूस केली. आरोपींकडून कोणत्याही प्रकारचा त्रास, दबाव किंवा धमकी दिली जात असल्यास तात्काळ पोलिस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी कुटुंबीयांना केले.
कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली. कोणतीही अडचण निर्माण झाल्यास संबंधित यंत्रणेला तातडीने माहिती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
या भेटीमुळे पीडित कुटुंबाला प्रशासनाकडून मिळणाऱ्या मदतीबाबत स्पष्टता मिळाली असून, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
यावेळी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शरद मरे, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم