५६३ ग्रामपंचायतींमध्ये ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला वेग
सामूहिक प्रयत्नातून आरोग्य चळवळ गतिमान करा : मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. २४ : ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्यमान उंचावण्यासोबतच तळागाळातील नागरिकांपर्यंत दर्जेदार, सर्वसमावेशक आणि गुणवत्तापूर्ण प्राथमिक आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १ एप्रिल २०२६ पासून ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व ५६३ ग्रामपंचायतींमध्ये या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून त्याचे व्यापक लोकचळवळीत रूपांतर करावे. सामूहिक प्रयत्नांतून जिल्ह्यातील आरोग्य चळवळ गतिमान करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ या अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका तसेच संबंधित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) समृद्धी दिवाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गडापोड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) विजय बोराटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी बुचाले, कार्यकारी अभियंता राजू नरवाडे, उपशिक्षणाधिकारी आसावरी काळे यांच्यासह जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
गाव निरोगी तर जिल्हा निरोगी
हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हे अभियान व्यापक लोकसहभागातून राबविण्याचे निर्देश देताना मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभियानासाठी स्वतःला झोकून देऊन काम करण्याचे आवाहन केले.
“सामूहिक प्रयत्नांतून जिल्ह्यातील किमान एक गाव राज्यस्तरावर बक्षीसपात्र झाले पाहिजे. गाव निरोगी झाल्यास जिल्हा निरोगी होईल आणि पर्यायाने राज्य निरोगी होईल,” असे गायकवाड यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्याला राज्यस्तरावर आदर्श बनविण्याचा सामूहिक संकल्प यावेळी करण्यात आला.
‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानासोबतच ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ प्रभावीपणे राबविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
‘प्रजा निरोगी, तर राज्य सशक्त’ हा अभियानाचा मूलमंत्र
‘प्रजा निरोगी, तर राज्य सशक्त’ या मूलभूत संकल्पनेवर ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची आखणी करण्यात आली आहे. हे अभियान केवळ आरोग्य तपासणीपुरते मर्यादित नसून आरोग्याला ग्रामविकासाच्या केंद्रस्थानी आणणारे व्यापक व्यासपीठ असल्याचे कार्यशाळेत स्पष्ट करण्यात आले.
ग्रामीण भागातील शेवटच्या घटकातील नागरिकाला त्याच्या घरापासून जवळ, सर्वसमावेशक, मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी आरोग्य सेवांचा प्रभावी लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविणे, आरोग्यविषयक जनजागृती करणे आणि नागरिकांच्या आरोग्यविषयक सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे यावर भर देण्यात येणार आहे.
अभियानाच्या नियोजनानुसार ३१ मार्चपर्यंत संबंधित पूर्वतयारी व नियोजित कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले.
आशा, अंगणवाडी सेविका व सरपंचांची भूमिका महत्त्वाची
“ग्रामीण भागात आरोग्याची मोठी चळवळ उभी करण्याची गरज आहे. आरोग्य विभागातील अधिकारी, गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायतींचे सरपंच यांनी या अभियानात आघाडीवर राहून उत्स्फूर्तपणे काम करावे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून हिंगोली जिल्ह्याला या अभियानांतर्गत राज्यपातळीवर आदर्श बनविण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहावे,” असे आवाहन विवेक गायकवाड यांनी केले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांनीही सर्व विभागांनी एकत्रितपणे आणि परस्पर समन्वयाने काम करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
ग्रामपंचायतींचे गुणांकन; पारितोषिकांची माहिती
कार्यशाळेत प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत ग्रामपंचायतींचे गुणांकन करण्याची पद्धत, मूल्यमापनाचे निकष तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या पारितोषिकांची माहिती उपस्थितांना दिली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी अभियानाची संपूर्ण रूपरेषा, आरोग्यविषयक उपक्रम आणि अपेक्षित परिणाम याबाबत मार्गदर्शन केले.
‘वर्तन बदल संवाद’ातून आरोग्यदायी सवयींवर भर
कार्यशाळेदरम्यान विविध तज्ज्ञांची मार्गदर्शनपर सत्रे घेण्यात आली. राज्यस्तरीय प्रशिक्षक स्नेहा गवई आणि प्रीती बगमारे यांनी ‘वर्तन बदल संवाद’ या विषयावर प्रात्यक्षिके आणि विविध खेळांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. नागरिकांच्या आरोग्यविषयक सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी संवादाच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती कशी करावी, याबाबत त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.
अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत, आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण, पशुसंवर्धन आणि इतर संबंधित विभागांमध्ये समन्वय वाढविण्यावर कार्यशाळेत विशेष भर देण्यात आला.
धन्वंतरी व संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन
कार्यशाळेच्या प्रारंभी आरोग्याची देवता भगवान धन्वंतरी आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये यांनी केले. जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र पुरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
टिप्पणी पोस्ट करा