समगा रेल्वे पुलाखाली महिलेचा संशयास्पद मृत्यू; सुराणा नगरमध्ये खळबळ
घटनास्थळी पोलिस दाखल; मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यासाठी तपास सुरू
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
29 सप्टेंबर 2026
हिंगोली : समगा येथील रेल्वे पुलाखाली एका महिलेचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा व पुढील तपासाची कार्यवाही सुरू केली.
मृत महिलेचे नाव दिव्या सुचित स्वामी (वय अंदाजे ३५ वर्षे) असे असल्याची माहिती मिळाली आहे. त्या सध्या घटस्फोटित असून, २०१८ पासून सुराणा नगर येथे आपल्या भावासोबत राहत असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
मृत महिलेचे भाऊ दीपक गणेश स्वामी (वय ४० वर्षे, व्यवसाय) हे सुराणा नगर, हिंगोली येथे वास्तव्यास असल्याची माहिती आहे. घटस्फोटानंतर दिव्या स्वामी या आपल्या भावासोबत राहत होत्या.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वगे, पोलीस कर्मचारी गायकवाड यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हा अपघात आहे की अन्य काही कारण आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात असून, तपासाअंतीच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, सुराणा नगर परिसरातील महिला रेल्वे पुलाखाली मृतावस्थेत आढळल्याची माहिती समोर येताच परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. पोलिस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा