पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श; जय हनुमान मित्र मंडळाचा अभिनव उपक्रम२०१७ पासून उपक्रम सुरू; जुन्या तांब्या-पितळेच्या भांड्यांपासून धातूच्या मूर्ती, मातीच्या मूर्तीचे जागेवरच विसर्जन — पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्याकडून कौतुक


पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श; जय हनुमान मित्र मंडळाचा अभिनव उपक्रम
२०१७ पासून उपक्रम सुरू; जुन्या तांब्या-पितळेच्या भांड्यांपासून धातूच्या मूर्ती, मातीच्या मूर्तीचे जागेवरच विसर्जन . पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्याकडून कौतुक

महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क
 20 सप्टेंबर 2026 
औंढा नागनाथ : धार्मिक परंपरेचा सन्मान राखत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा अभिनव उपक्रम शिरडशहापूर येथील मराठा गल्लीतील जय हनुमान मित्र मंडळाने २०१७ पासून सातत्याने राबविला आहे. या उपक्रमाचे औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी कौतुक केले.
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गावातील सुमारे १५० कुटुंबांकडून जुन्या तांब्या-पितळेच्या भांड्यांचे संकलन करून त्यापासून श्री गणेश व दुर्गामातेच्या टिकाऊ धातूच्या मूर्ती तयार करून घेतल्या आहेत. दरवर्षी नवीन मूर्ती खरेदी करण्याचा खर्च वाचवून हा निधी समाजोपयोगी कामांसाठी वापरण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.
विसर्जनासाठी मुख्य धातूच्या मूर्तीऐवजी छोटी मातीची मूर्ती एका पातेल्यात जागेवरच विसर्जित केली जाते. त्यानंतर हे पाणी तुळस, इंद्रावण आदी वनस्पतींसाठी वापरले जाते. यामुळे पाण्याचा अपव्यय व जलप्रदूषण टाळण्यासोबतच विसर्जनानंतर मूर्तींची होणारी विटंबना रोखण्यास मदत होते.
समाजोपयोगी कामांनाही प्राधान्य
जय हनुमान मित्र मंडळाने पर्यावरणपूरक उपक्रमासोबतच सांस्कृतिक सभागृह, स्मशानभूमी, अभ्यासिका तसेच सुमारे १५० ते २०० घरांसाठी पाणीपुरवठा योजना अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांना हातभार लावला आहे.
धातूंचा पुनर्वापर, पाणी बचत, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या उपक्रमातून साधला जात आहे. धार्मिक श्रद्धा कायम ठेवत पर्यावरणपूरक बदल स्वीकारण्याचा हा उपक्रम इतर गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
“श्रद्धा मनात, श्रींचा सन्मान कृतीत आणि पर्यावरणाचे रक्षण प्रत्येक उपक्रमात,” या विचारातून मंडळाने सुरू केलेली ही पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने