हिंगोली जिल्ह्यात ‘तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ १०० दिवसीय अभियानाचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्न
मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. 14 सप्टेंबर : राज्यात असंसर्गजन्य रोगांचे (NCD) प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी दिनांक १ सप्टेंबर २०२६ पासून ‘तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ हे १०० दिवसीय विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हिंगोली जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच जिल्हास्तरीय पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण जिल्हा प्रशिक्षण संघ, हिंगोली येथे आयोजित करण्यात आले.
या १०० दिवसीय अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये असंसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती, वेळेवर तपासणी, आजारांचे लवकर निदान आणि आवश्यक उपचार व आरोग्यविषयक सल्ला उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे वेळीच निदान झाल्यास त्यावरील नियंत्रण आणि उपचार अधिक प्रभावीपणे करता येतात. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत तपासणी व मार्गदर्शनाची सुविधा पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रशिक्षण कार्यक्रमास छत्रपती संभाजीनगर येथील जागतिक आरोग्य संघटनेचे एसएमओ डॉ. मुजीब सय्यद, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण, जिल्हा परिषद संघाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा महाले तसेच साथरोग तज्ज्ञ तथा जिल्हा समन्वयक (एनसीडी) डॉ. इनायतुल्ला खान यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी तज्ज्ञांनी अभियानाची उद्दिष्टे, नियोजन, क्षेत्रीय स्तरावर करावयाच्या उपाययोजना, नागरिकांची तपासणी, आजारांचे लवकर निदान, नोंदणी, संदर्भ सेवा तसेच उपचार व पाठपुरावा याबाबत मार्गदर्शन केले. अभियानाच्या कालावधीत आरोग्य विभागातील प्रत्येक घटकाने समन्वयाने काम करून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
प्रशिक्षणानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे एसएमओ डॉ. मुजीब सय्यद यांनी माता-बाल संगोपन कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेतला. माता व बाल आरोग्याशी संबंधित विविध बाबींचा आढावा घेताना त्यांनी आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढविणे, लाभार्थ्यांपर्यंत वेळेवर सेवा पोहोचविणे आणि उपलब्ध आरोग्य सुविधांचा प्रभावी वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले.
जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी १०० दिवसीय अभियानाच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला चालना देण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न असून, या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा