‘सीआयडी पोलीस आहोत’ सांगून शिक्षकाला लुटले; १ लाख ६२ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास
दोन अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल
पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
नऊ सप्टेंबर 2026
हिंगोली : ‘थांबा, थांबा… आम्ही सीआयडी पोलीस आहोत’ अशी बतावणी करून एका शिक्षकाला रस्त्यात अडवून त्याच्याकडील सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्याची घटना हिंगोली शहराजवळील कयाधू नदी पुलाच्या परिसरात घडली. या प्रकारात शिक्षकाचे तब्बल १ लाख ६२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रताप नाथराव पतंगे (वय ५२, व्यवसाय शिक्षक, रा. आनंद नगर, बळसोंड, हिंगोली) हे ८ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ९ वाजता हिंगोली ते औंढा रोडवरून जात होते. कयाधू नदी पुलाच्या समोरील वळणावर, हिंगोलीच्या दक्षिणेस सुमारे दोन किलोमीटर अंतरावर, बिट क्रमांक १ परिसरात दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवले.
यावेळी संबंधित इसमांनी आपण ‘सीआयडी पोलीस’ असल्याचे सांगितले. तसेच, पुढे गांजा पकडण्यात आला असून काही इसम चाकूने हल्ला करीत असल्याचे सांगून पतंगे यांना सावध राहण्यास सांगितले. या कथित पोलिसी बतावणीमुळे घाबरलेल्या पतंगे यांना त्यांच्या जवळील मोबाईल तसेच हातातील सोन्याच्या अंगठ्या काढण्यास सांगण्यात आले.
त्यानंतर आरोपींनी पतंगे यांच्या रुमालात मोबाईल व सोन्याच्या अंगठ्या गुंडाळून ठेवल्याचा भास निर्माण केला. रुमाल खिशात ठेवण्यास सांगून तेथून निघून जाण्यास सांगितले. पतंगे हे शाळेत पोहोचल्यानंतर त्यांनी खिशातील रुमाल काढून पाहिला असता त्यामध्ये मोबाईल फोन आढळला; मात्र सोन्याच्या अंगठ्या गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये १ लाख २० हजार रुपये किमतीच्या दोन पिवळ्या रंगाच्या, प्रत्येकी एक तोळा वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या तसेच ४२ हजार रुपये किमतीची पांढरा खडा असलेली, सात ग्रॅम वजनाची पिवळ्या रंगाची सोन्याची अंगठी यांचा समावेश आहे. अशा एकूण १ लाख ६२ हजार रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.
घटनेनंतर पतंगे यांनी ९ सप्टेंबर रोजी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात येऊन तोंडी फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा क्रमांक ५८३/२०२६, भारतीय न्याय संहितेतील कलम २०४, ३१९(२), ३(५) अन्वये दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार गारवे करीत असून, घटनास्थळी पोलीस निरीक्षक गुट्टे यांच्यासह पोलीस हवालदार गारवे . सध्या या प्रकरणात कोणालाही अटक झालेली नसून चोरीस गेलेला मुद्देमालही अद्याप हस्तगत झालेला नाही.
दरम्यान, पोलिसांकडून या दोन अनोळखी इसमांचा शोध घेण्यात येत असून, घटनास्थळाच्या परिसरातील उपलब्ध माहिती व संभाव्य पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.
إرسال تعليق