औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांना सर्वोतोपरी सहकार्य— पालकमंत्री नरहरी झिरवाळहिंगोली एमआयडीसीमध्ये प्लास्टिक पॅरालिसिस ऑईल फॅक्टरीचे लोकार्पण

औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांना सर्वोतोपरी सहकार्य....!
 पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोली एमआयडीसीमध्ये प्लास्टिक पॅरालिसिस ऑईल फॅक्टरीचे लोकार्पण

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
18 सप्टेंबर 2026
हिंगोली, दि. 17 : हिंगोली जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या सकारात्मक आणि रोजगारनिर्मिती करणाऱ्या उपक्रमांना शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.
हिंगोली एमआयडीसी परिसरात प्लास्टिक पॅरालिसिस ऑईल फॅक्टरीचे लोकार्पण पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते दि. 16 रोजी करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, सतीश टापरे यांच्यासह उद्योजक, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
प्लास्टिक कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असताना त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर व पुनर्वापरयोग्य घटकांची निर्मिती करणारे प्रकल्प पर्यावरणाच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण आहेत. प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासोबतच त्यातून औद्योगिक उपयोगासाठी आवश्यक उत्पादने निर्माण करण्याची क्षमता अशा प्रकल्पांमध्ये आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापन आणि औद्योगिक विकास यांचा समन्वय साधण्याच्या दृष्टीने प्लास्टिक पॅरालिसिस प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे पालकमंत्री झिरवाळ यांनी सांगितले.
स्थानिक पातळीवर उद्योगधंद्यांना चालना मिळाल्यास जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होईल. हिंगोलीसारख्या जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्राचा विस्तार होणे आवश्यक असून, स्थानिक उद्योजकांनी पुढाकार घेतल्यास जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती मिळू शकते. औद्योगिक विकासाला पूरक आणि सकारात्मक उपक्रमांना प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रकल्पाची कार्यपद्धती जाणून घेतली
लोकार्पणानंतर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्लास्टिक पॅरालिसिस ऑईल फॅक्टरीची पाहणी केली. प्रकल्पात प्लास्टिक कचऱ्यावर कोणत्या पद्धतीने प्रक्रिया केली जाते, त्यातून कोणते घटक व उत्पादने निर्माण होतात, प्रकल्पाची कार्यक्षमता आणि दैनंदिन कामकाज याबाबत त्यांनी संबंधित उद्योजक व कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली.
उद्योजक, अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांशी त्यांनी संवाद साधत प्रकल्पाच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. स्थानिक पातळीवर अशा प्रकारचे उद्योग उभे राहिल्याने जिल्ह्यातील औद्योगिक वातावरणाला चालना मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी प्रकल्पाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हिंगोली एमआयडीसीमध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पामुळे प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्वापरासोबतच स्थानिक औद्योगिक क्षेत्राला आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم