दाटेगावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे राज्यस्तरीय मूल्यमापन उत्साहात
महिला बचत गटांचा उत्स्फूर्त सहभाग; लोकसहभागातून ग्रामविकासाचा आदर्श उभारण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. ५ सप्टेंबर २०२६ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत दाटेगाव येथे शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय मूल्यमापन समितीच्या उपस्थितीत विविध विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि ग्रामविकासाच्या उपक्रमांचे पाहणी व मूल्यमापन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. राज्यस्तरीय मान्यवरांच्या उपस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
राज्यस्तरीय मूल्यमापन समितीचे नेतृत्व ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव मा. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. यावेळी आदर्श गाव समिती, महाराष्ट्र राज्यचे कार्याध्यक्ष मा. श्री. पोपटराव पवार, CEO उमेद मा. श्रीधर डुबे पाटील, यशदा पुणे येथील राग्रावीसं संचालक मा. डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, संचालक पंचायत राज मा. श्री. गिरीश भालेराव, सरपंच ग्रामपंचायत बेला, जि. भंडारा मा. श्रीमती शारदा गायधने, ग्रामविकास विभागाचे उपसचिव मा. श्री. प्रशांत पाटील, कक्ष अधिकारी मा. श्री. सागर मनोरे आणि सहायक संचालक मा. श्री. वैभव ठाकूर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी मागील एका महिन्यापासून दाटेगाव येथे वेळोवेळी बैठक घेऊन गावकऱ्यांना मार्गदर्शन केले होते
दरम्यान
उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे प्रकल्प अधिकारी नामदेव केंद्रे जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामविकास विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समितीने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामविकासाच्या कामांचा आढावा घेतला.
महिला बचत गटांचा लक्षणीय सहभाग
मूल्यमापन कार्यक्रमात दाटेगाव ग्रामपंचायतीसह परिसरातील महिला बचत गटांच्या महिला, ग्रामस्थ, युवक-युवती तसेच महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. विशेषतः महिलांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. महिला बचत गटांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी समितीसमोर सादर करण्यात आली.
महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन, बचत गटांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, ग्रामस्वच्छता, सामाजिक उपक्रम आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची समितीने माहिती घेतली.
ग्रामविकासाच्या उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी
ग्रामपंचायत दाटेगावने लोकसहभागातून राबविलेल्या विविध विकासकामे व उपक्रमांची पाहणी समितीने केली. ग्रामस्वच्छता, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, सामाजिक सहभाग, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच ग्रामस्थांचा विकास प्रक्रियेत असलेला सहभाग या बाबींवर विशेष भर देण्यात आला.
ग्रामस्थांनी विकासकामांमध्ये घेतलेला पुढाकार, महिला बचत गटांची सक्रिय भूमिका आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे गावात निर्माण झालेले सकारात्मक वातावरण याची समितीने पाहणी केली. गावातील विविध घटकांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याच्या प्रयत्नांचेही यावेळी मूल्यमापन करण्यात आले.
दाटेगावमध्ये ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग, महिला बचत गटांची सक्रियता आणि प्रशासनाचा समन्वय यामुळे ग्रामविकासाची सकारात्मक दिशा निर्माण झाल्याचे चित्र राज्यस्तरीय मूल्यमापनातून स्पष्ट झाले. विकासकामांमध्ये केवळ शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी पुढाकार घेणे ही या उपक्रमाची जमेची बाजू ठरली.
राज्यस्तरीय मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा कार्यक्रम केवळ मूल्यमापनापुरता मर्यादित न राहता ग्रामस्थांच्या एकजुटीचा, महिलांच्या सहभागाचा आणि लोकसहभागातून विकास साधण्याच्या सामूहिक इच्छाशक्तीचा उत्सव ठरला.
इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी उपक्रम
“गावाचा विकास हा केवळ शासनाचा विषय नसून गावकऱ्यांच्या सहभागातून घडणारी सामूहिक चळवळ आहे,” हा संदेश दाटेगावच्या उपक्रमातून अधोरेखित झाला. ग्रामस्थ, महिला बचत गट, युवक आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे विकास प्रक्रियेत योगदान दिल्यास गावाच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळू शकते, हे या कार्यक्रमातून दिसून आले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींमध्ये विकासाभिमुख स्पर्धा, लोकसहभाग आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांना चालना मिळत असून दाटेगाव येथील उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठीही प्रेरणादायी ठरणारा आहे.
राज्यस्तरीय मूल्यमापन समितीच्या भेटीमुळे ग्रामस्थांमध्ये नव्या उमेदीचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळातही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभागातून विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा