गणपती विसर्जन मिरवणुकीत गुलालाऐवजी फुलांचा वर्षाव करा
धार्मिक स्थळांजवळ विशेष दक्षता घेण्याचे आवाहन
पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
24 सप्टेंबर 2026
औंढा नागनाथ : गणेश विसर्जन मिरवणुकीत गुलालाचा वापर टाळून फुलांचा वर्षाव करावा, तसेच धार्मिक स्थळांजवळ विशेष दक्षता घेऊन कोणाच्याही धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य अथवा घोषणाबाजी करू नये, असे आवाहन औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांनी गणेश मंडळांचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिकांना केले आहे.
औंढा नागनाथ पोलिस ठाण्याच्या हद्दीत यंदा १९० ठिकाणी गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये औंढा शहरातील २५ गणेशमूर्तींचा समावेश असून, त्यापैकी १२ मानाचे गणेश मंडळे आहेत. गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा होत असताना आता विसर्जन मिरवणुकांची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने मंडळांना विविध सूचना दिल्या आहेत.
धार्मिक भावना जपण्याचे आवाहन
विसर्जन मिरवणुकीदरम्यान धार्मिक स्थळे, संवेदनशील ठिकाणे आणि गर्दीच्या परिसरात विशेष काळजी घ्यावी, कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील असे प्रकार टाळावेत, असे पोलिस निरीक्षक डोंगरे यांनी स्पष्ट केले. मिरवणुकीत गुलाल उधळण्याऐवजी फुलांचा वर्षाव करून गणरायाला निरोप द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
मिरवणुकीत सहभागी मंडळांनी पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. मिरवणूक निर्धारित वेळेत सुरू करून वेळेत विसर्जन पूर्ण करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
सीसीटीव्हीची राहणार नजर
औंढा शहरासह ग्रामीण भागातील गणेश विसर्जन मिरवणुका सीसीटीव्हीच्या निगराणीखाली पार पडणार आहेत. मिरवणूक मार्ग, धार्मिक स्थळे तसेच अन्य महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
पोलिस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली शहरासह ग्रामीण भागात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
१४ गावांत ‘एक गाव, एक गणपती’
औंढा नागनाथ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तळणी, हिवरखेडा, अनखळीवाडी, धारखेडा, पोटा बुद्रुक, दोडगाव, लक्ष्मण नाईक तांडा, निशाणा, टेंभुरदरा, सावळीतांडा, नंदगाव, पिंपळा, हिवराजाटू आणि जलालपूर या १४ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमामुळे गणेशोत्सवात एकोप्याचे आणि सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यास मदत होत आहे.
नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई
“गुलालाऐवजी फुलांचा वर्षाव करा. धार्मिक भावना जपा आणि वेळेत विसर्जन पूर्ण करा. सीसीटीव्हीची नजर आणि पोलिस बंदोबस्त राहणार असून नियमभंग करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल,” असा इशारा पोलिस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांनी दिला आहे.
गणेश मंडळांनी पोलिस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून शांतता, शिस्त आणि सामाजिक सलोखा राखत गणरायाला निरोप द्यावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
إرسال تعليق