कळमनुरी गोळीबार प्रकरणातील 17 आरोपींवर MCOCA अंतर्गत कारवाई पोलीस अधीक्षक श्रनिक लोढा महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क

कळमनुरी गोळीबार प्रकरणातील 17 आरोपींवर MCOCA अंतर्गत कारवाई

पोलीस अधीक्षक श्रनिक लोढा 
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
04 ऑक्टोबर 2026
हिंगोली : कळमनुरी शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात 15 जुलै रोजी दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील तब्बल 17 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू आहे.
वादातून गोळीबार; एकाचा मृत्यू
15 जुलैच्या रात्री कळमनुरी शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात दोन गटांमध्ये किरकोळ वादातून वादावादी झाली. या वादाचे रूपांतर पुढे गोळीबारात झाले. या घटनेत 38 वर्षीय लुकमान सिद्दीकी यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर शेरू उर्फ इम्रान पठाण यांच्या तक्रारीवरून 16 जुलै रोजी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींचा शोध घेत कारवाई सुरू केली.
17 आरोपींवर MCOCAचा प्रस्ताव
घटनेचे गांभीर्य आणि आरोपींच्या संघटित पद्धतीने केलेल्या कथित गुन्हेगारी कारवायांची दखल घेत पोलिसांनी या प्रकरणातील 17 आरोपींवर MCOCA अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांच्या निर्देशानुसार या कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला. प्रस्तावाची वरिष्ठ पातळीवर तपासणी झाल्यानंतर तो नांदेड परिक्षेत्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. मंजुरी मिळाल्यानंतर 17 आरोपींविरुद्ध MCOCA अंतर्गत कारवाईचा मार्ग मोकळा झाला.
13 आरोपी अटकेत; चौघांचा शोध सुरू
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 13 आरोपींना अटक केली आहे. तर उर्वरित चार आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.
तपासादरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे, वाहने तसेच तांत्रिक व डिजिटल पुरावे ताब्यात घेतले आहेत. आरोपींनी गट तयार करून दहशतीच्या माध्यमातून गुन्हेगारी कारवाया केल्याचा पोलिसांचा प्राथमिक तपास असल्याचे सांगण्यात आले आहे.
आरोपींची नावे
या प्रकरणात MCOCA अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या 17 आरोपींमध्ये —
शेख शकील शेख खलिल
शेख जमीर शेख खलिल
शेख समीर शेख खलिल
अझहर खान वलियाद खान पठाण
शाहीन नाईक मतीन नाईक
फहीम नाईक तल्हा नाईक
किशोर भालेराव (नगरसेवक)
यश गायकवाड
शेख फारुख
आसिफ शेख खलिल
साहील नाईक शाईन नाईक
शेख शहबाज शेख अश्पाक
मोसीनखान छोटे खान पठाण
सय्यद फारुख सय्यद रहीम
मुस्तकीन शेख गणी
इम्रान खान दाऊद खान पठाण
शिबगट उर्फ शिबू खसलत नायक
यांचा समावेश असल्याचे दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.
तपासाची जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे
MCOCA अंतर्गत कारवाईस मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी एन. एस. देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा पुढील कायदेशीर तसेच वैज्ञानिक तपास सुरू आहे.
पोलिसांकडून घटनास्थळावरील पुरावे, शस्त्रे, वाहने, तांत्रिक माहिती आणि डिजिटल पुराव्यांचा तपास केला जात आहे. फरार असलेल्या चार आरोपींचा शोध घेण्यासाठीही पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
जिल्ह्यात संघटित गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाई
हिंगोली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यापूर्वीही विविध गंभीर गुन्ह्यांतील आरोपींविरुद्ध MCOCA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कळमनुरीतील गोळीबाराच्या घटनेत 17 आरोपींवर एकाचवेळी MCOCA लागू करण्याची कारवाई ही संघटित गुन्हेगारीविरोधातील पोलिसांच्या भूमिकेचा महत्त्वाचा भाग मानली जात आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी 25 जून रोजी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात या प्रकरणात MCOCAची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील ही महत्त्वाची कारवाई ठरली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने