फटाक्याच्या आगीत जखमींची पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतली भेट
मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून तात्काळ मदत देणार : पालकमंत्री नरहरी झिरवाळ
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
07 ऑक्टोंबर 2026
हिंगोली : शहरातील मारवाड गल्ली परिसरात फटाक्याच्या आगीत झालेल्या भीषण दुर्घटनेतील जखमींची पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी त्यांनी जखमींच्या प्रकृतीची माहिती घेत डॉक्टरांशी चर्चा केली तसेच आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या नगरसेवक कपिल खंडेलवाल, आशिष चौधरी यांच्यासह इतर जखमी रुग्णांची पालकमंत्री झिरवाळ यांनी भेट घेतली. जखमींवर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेत त्यांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला.
यावेळी लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलचे संचालक अशोकराव अग्रवाल यांनी पालकमंत्री झिरवाळ यांना दुर्घटनेची सविस्तर माहिती दिली. आगीत जखमी झालेल्या रुग्णांची प्रकृती, त्यांच्यावर करण्यात येत असलेले उपचार तसेच पुढील उपचारांची आवश्यकता याबाबत त्यांनी माहिती दिली.
यावेळी डॉ. अशोक अग्रवाल, डॉ. मयूर अग्रवाल, डॉ. प्राची अग्रवाल, डॉ. विजया अग्रवाल, डॉ. शेळके, डॉ. राऊत, डॉ. आसोले, डॉ. मुटकुळे यांच्यासह रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
फटाक्याच्या आगीत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना तसेच जखमींच्या नातेवाईकांना शासनाकडून तात्काळ मदत करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले. दुर्घटनेतील जखमींना आवश्यक उपचार मिळावेत आणि उपचारात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
दरम्यान, या भीषण दुर्घटनेमुळे हिंगोली शहरात हळहळ व्यक्त होत असून, जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी नागरिकांकडून प्रार्थना केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा