पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
09 ऑक्टोबर 2026 

हिंगोली जिल्ह्यात ३६ मतदान केंद्रे सज्ज; २३० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

मतदान प्रक्रिया पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण; विविध पथकांची स्थापना

हिंगोली, दि. ९ (जिमाका) : ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ३६ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, मतदान प्रक्रियेच्या व्यवस्थापनासाठी २३० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पदवीधर मतदारांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मोठ्या संख्येने मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रगती चौंडेकर यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

२३ ऑक्टोबर रोजी मतदान

०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. हिंगोली जिल्ह्यात या निवडणुकीसाठी एकूण ३६ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात एकूण १० हजार ३१५ पदवीधर मतदार असून, त्यामध्ये ८ हजार ३३७ पुरुष आणि १ हजार ९७८ महिला मतदारांचा समावेश आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पात्र मतदारांचा सहभाग महत्त्वाचा असल्याने प्रत्येक मतदाराने मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावावा. मतदान प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावी, यासाठी आवश्यक त्या सर्व प्रशासकीय उपाययोजना करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीसाठी विविध पथकांची स्थापना

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हास्तरावर नोडल अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवरील व्यवस्थापन, निवडणूकविषयक कामकाजाचे नियोजन आणि आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर आहे.

मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील बंदोबस्तासाठी ३६ पोलीस अंमलदार आणि एक गस्त वाहन नियुक्त करण्यात आले आहे. यामुळे मतदान केंद्र परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे. निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा समन्वयाने काम करणार आहेत.

२३० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

हिंगोली जिल्ह्यातील निवडणूक व्यवस्थापनासाठी विविध जबाबदाऱ्या पार पाडण्याकरिता एकूण २३० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये १५ क्षेत्रीय अधिकारी, ४३ मतदान केंद्राध्यक्ष, १३० मतदान अधिकारी-कर्मचारी आणि ४२ सूक्ष्म निरीक्षकांचा समावेश आहे.

निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. निवडणूक प्रक्रियेतील जबाबदाऱ्या, मतदान केंद्रांवरील कामकाज आणि आवश्यक कार्यपद्धती याबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

दुसरे प्रशिक्षण १६ ऑक्टोबर रोजी, तर तिसरे प्रशिक्षण २२ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणांच्या माध्यमातून निवडणूक कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे.

मतदान केंद्रांवर आरोग्य पथकांची व्यवस्था

मतदानाच्या दिवशी मतदार तसेच निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार तातडीची वैद्यकीय मदत मिळावी, यासाठीही प्रशासनाने नियोजन केले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली यांच्या माध्यमातून मतदान केंद्रनिहाय आरोग्य पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

या आरोग्य पथकांद्वारे गरजेनुसार प्रथमोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक अडचणींवर तातडीने मदत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करण्याचे आवाहन

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध विभागांच्या समन्वयातून तयारी केली आहे. मतदान केंद्रांवरील आवश्यक व्यवस्था, मनुष्यबळाचे नियोजन, पोलीस बंदोबस्त, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि आरोग्य सुविधांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व पदवीधर मतदारांनी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم