हिंगोलीत दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचा उत्साह; जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटनबोधडीच्या अंध क्रिकेट संघासह व्हीलचेअर क्रिकेट संघाची बाजी; विजेत्यांना पाच हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन गौरव

 हिंगोलीत दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचा उत्साह; जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन

बोधडीच्या अंध क्रिकेट संघासह व्हीलचेअर क्रिकेट संघाची बाजी; विजेत्यांना पाच हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन गौरव

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
12 ऑक्टोंबर 2026
हिंगोली / प्रतिनिधी : दसरा महोत्सवाचे औचित्य साधून हिंगोली येथे सार्वजनिक दसरा महोत्सव समिती आणि पत्रकार क्रिकेट संघ, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे उद्घाटन सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत व्हीलचेअर क्रिकेट संघ आणि अंध क्रिकेटपटूंनी आपल्या खेळातील कौशल्याचे दर्शन घडविले. व्हीलचेअर क्रिकेटमध्ये हिंगोलीच्या बी संघाने, तर अंध क्रिकेट स्पर्धेत बोधडी येथील अंध विद्यालयाच्या संघाने प्रथम पारितोषिक पटकावले.
दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यातील क्रीडागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक दसरा महोत्सव समिती व पत्रकार क्रिकेट संघाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून दिव्यांग खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळाली. मैदानावर खेळाडूंनी दाखविलेला उत्साह आणि जिद्द उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरली.

उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

 व्हीलचेअर क्रिकेटमध्ये हिंगोलीच्या बी संघाचे यश
स्पर्धेअंतर्गत दिव्यांग व्हीलचेअर क्रिकेट संघ हिंगोलीच्या ए आणि बी संघांमध्ये सामना रंगला. दोन्ही संघांनी मैदानावर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. या अटीतटीच्या सामन्यात व्हीलचेअर क्रिकेट संघाच्या बी संघाने विजय मिळवत प्रथम पारितोषिकावर आपले नाव कोरले.

विजेत्या संघाला पाच हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. दिव्यांग खेळाडूंच्या जिद्दीचे आणि खेळाप्रती असलेल्या समर्पणाचे उपस्थितांनी कौतुक केले.

 बोधडीच्या अंध क्रिकेट संघाने पटकावले प्रथम पारितोषिक
दुसऱ्या सामन्यात बोधडी येथील अंध विद्यालयाचा क्रिकेट संघ आणि लातूर येथील अंध क्रिकेट संघ यांच्यात सामना झाला. या सामन्यात दोन्ही संघांनी उत्साहाने सहभाग घेतला. अखेर बोधडी येथील अंध विद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम पारितोषिक पटकावले.

भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार गजानन घुगे यांच्या हस्ते विजेत्या संघाला पाच हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक आशिष पिंगळकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमाला सुमित चौधरी, नफीज पैलवान, विलास गोरे, भाजपाचे शहराध्यक्ष रजनीश पुरोहित, आशिष पिंगळकर, गोपाल भोस आदींची उपस्थिती होती.

पत्रकार क्रिकेट संघाच्या पदाधिकाऱ्यांचे परिश्रम
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पत्रकार क्रिकेट संघाचे कर्णधार विजय गुंडेकर, गजानन मगर, राकेश धोंडे  सुनील पाठक, सुधीर गोगटे, सुधाकर वाढवे सुमित कान्हेड, दिलीप हळदे, संतोष आठवले, सुनील नागरे, बाबा ढोकणे, गणेश घ्यार, बाळू जाधव, विकास जाधव, सचिन कावडे, , राजेंद्र हलवाई, प्रशांत गुप्ता, गोपाल सरनायक, श्याम सोळंके, नामदेव कापसे, कपिल सावळे, निलेश गरवारे, अनिस अहमद, अरुण दिपके, शेख मजर आणि मदन शेळके आदींनी परिश्रम घेतले.

दिव्यांग खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात समान संधी मिळावी, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा आणि समाजात सकारात्मक संदेश पोहोचावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे दसरा महोत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली. दिव्यांग खेळाडूंच्या जिद्द, चिकाटी आणि क्रीडाकौशल्याचे दर्शन घडविणारा हा उपक्रम उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने