हिंगोली जिल्हा परिषदेच्या ८७५ शाळांमध्ये ‘बुक डोनेशन कॅम्प’ उत्साहात
‘सेवा संकल्प अभियाना’तून ग्रंथालये समृद्ध करण्याचा उपक्रम; मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची पाहणी
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
17 ऑक्टोबर 2026
हिंगोली, प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ग्रंथालये समृद्ध व्हावीत, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, या उद्देशाने हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ८७५ शाळांमध्ये ‘बुक डोनेशन कॅम्प’चे आयोजन करण्यात आले. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या या अभियानाला विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमांतर्गत राहोलि खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून उपक्रमाची पाहणी केली तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची प्रत्यक्ष पडताळणी
राहोली खुर्द येथील शाळेला भेट दिल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांना बाराखडी तसेच इंग्रजी विषयातील टेन्स अर्थात काळ यासंबंधी प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेतील ज्ञान, आकलन क्षमता आणि अभ्यासाची पातळी जाणून घेत त्यांनी शैक्षणिक प्रगतीची प्रत्यक्ष पडताळणी केली.
लोकसहभागातून शाळांची ग्रंथालये होणार समृद्ध
‘सेवा संकल्प अभियाना’च्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये लोकसहभागातून पुस्तके जमा करण्यात आली. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच अवांतर वाचनाची संधी मिळावी, त्यांच्यामध्ये वाचनसंस्कृती रुजावी आणि ज्ञानाचा आवाका वाढावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
जिल्हा परिषदेच्या ८७५ शाळांमध्ये एकाच वेळी राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शालेय ग्रंथालयांच्या बळकटीकरणाला चालना मिळाली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने लोकसहभागातून शैक्षणिक विकास साधण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करून त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा