बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीचे खरेदीखत करणे अंगलटहिंगोली शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीचे खरेदीखत करणे अंगलट
हिंगोली शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
21 ऑक्टोबर 2026
हिंगोली : बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतजमिनीचे खरेदीखत करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हिंगोली येथील प्रभारी सहदुय्यम निबंधक यांनी दिलेल्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित खरेदीखत ६ जानेवारी २०२२ रोजी करण्यात आले होते. या प्रकरणी १९ ऑक्टोबर रोजी गुन्ह्याची नोंद झाली आहे.

लोहरा शिवारातील जमिनीचा व्यवहार

या प्रकरणी प्रभारी सहदुय्यम निबंधक दशरथ दत्त हंबर्डे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, हिंगोली तालुक्यातील लोहरा शिवारातील गट क्रमांक ४३ मधील ०.७८ हेक्टर शेतजमिनीचे खोटे व बनावट कागदपत्र तयार करून खरेदीखत करण्यात आले होते. या जमिनीच्या व्यवहाराची नोंद दस्त क्रमांक १०६/२०२२ अन्वये करण्यात आली होती.

आदिवासी असल्याची माहिती असतानाही व्यवहार केल्याचा आरोप

तक्रारीत नमूद केल्यानुसार, शिवराम नागोजी सोनटक्के हे आदिवासी समाजातील असून, त्यांच्या शेतजमिनीच्या विक्रीसाठी सक्षम अधिकाऱ्यांची आवश्यक परवानगी घेणे अपेक्षित होते. मात्र, आपण आदिवासी नसल्याचे सांगून बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली आणि संबंधित जमीन रामलखन बळीराम साबळे यांना विक्री करण्यात आली, असा आरोप आहे.

शेतजमिनीचे मूळ मालक आदिवासी समाजातील असल्याची माहिती रामलखन बळीराम साबळे, गजानन शिवराम सोनटक्के आणि साक्षीदार शिवशंकर नारायण पद्मने यांना असतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदीखत करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या व्यवहारातून शासनाची फसवणूक झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू

प्रभारी सहदुय्यम निबंधक दशरथ दत्त हंबर्डे यांच्या तक्रारीवरून शिवराम नागोजी सोनटक्के, रामलखन बळीराम साबळे, गजानन शिवराम सोनटक्के आणि शिवशंकर नारायण पद्मने या चौघांविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली    दीपक मस्के करीत आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीचे खरेदीखत केल्याच्या या प्रकरणामुळे हिंगोली शहरात चर्चा सुरू झाली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने