फटाक्याच्या आगीत गंभीर जखमींवर खासगी रुग्णालयात मोफत उपचार
लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलच्या डॉक्टरांसह संपूर्ण टीमचे मानवतेचे दर्शन; संकटसमयी तातडीने वैद्यकीय मदत
महाराष्ट्रात 24 न्यूज नेटवर्क
7 ऑक्टोंबर 2026
हिंगोली : शहरातील मारवाड गल्ली परिसरात सोमवारी रात्री फटाक्यांमुळे लागलेल्या भीषण आगीत अनेक नागरिक जखमी झाले. या घटनेने संपूर्ण हिंगोली शहर हादरले असताना, जखमींच्या मदतीसाठी नागरिकांसह विविध स्तरांतून मदतीचे हात पुढे आले. दरम्यान, आगीत गंभीररीत्या जखमी झालेल्या नागरिकांवर येथील लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करून डॉक्टरांनी आणि हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमने मानवतेचे दर्शन घडविले.
आगीच्या घटनेनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. अखिल अग्रवाल आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने कोणताही विलंब न करता जखमींवर उपचार सुरू केले.
आगीमुळे भाजलेल्या रुग्णांना आवश्यक प्राथमिक उपचार, वैद्यकीय तपासणी तसेच पुढील उपचारांची व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे, संकटाच्या या काळात जखमी नागरिकांच्या उपचाराचा आर्थिक भार लक्षात न घेता सर्व जखमींवर मोफत वैद्यकीय उपचार करण्यात आले.
या दुर्घटनेत आप्तस्वकीय जखमी झाल्याने कुटुंबीयांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. अशा वेळी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी जखमींची काळजी घेत त्यांना आवश्यक वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली. त्यामुळे संकटाच्या काळात वैद्यकीय सेवेबरोबरच माणुसकीची जाणीव जपण्याचे काम लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलने केले.
फटाक्यांच्या आगीसारख्या अचानक उद्भवलेल्या दुर्घटनेत उपचारासाठी धावून आलेल्या जखमींना आर्थिक परिस्थितीचा विचार न करता मोफत उपचार देणे ही समाजाप्रती असलेली बांधिलकी असल्याचे यावेळी दिसून आले. डॉ. अखिल अग्रवाल आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या या निर्णयाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
संकटसमयी वैद्यकीय मदतीचा हात
दुर्घटनेच्या काळात प्रत्येक जखमी व्यक्तीला वेळेत उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. मारवाड गल्लीतील या दुर्घटनेनंतर लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलने तत्परता दाखवत जखमींना उपचार उपलब्ध करून दिले. मोफत उपचाराच्या या उपक्रमातून वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे दर्शन घडले.
إرسال تعليق