दिवाळीच्या सणात ऑनलाइन खरेदी करताना सावधान! सायबर फसवणुकीचा धोका; पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांचे नागरिकांना आवाहनफसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा

 दिवाळीच्या सणात ऑनलाइन खरेदी करताना सावधान! सायबर फसवणुकीचा धोका; पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांचे नागरिकांना आवाहन

फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
31 ऑक्टोबर 2026
औंढा नागनाथ : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग सुरू झाली आहे. सणासुदीच्या काळात अनेक नागरिक ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देत असतात. मात्र, याच संधीचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता वाढते. आकर्षक ऑफर्स, मोठ्या सवलती, बनावट लिंक, खोट्या वेबसाईट आणि अनोळखी ऑर्डरच्या माध्यमातून नागरिकांना जाळ्यात ओढले जाऊ शकते. त्यामुळे दिवाळीच्या आनंदावर सायबर फसवणुकीचे विरजण पडू नये, यासाठी नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी केले आहे.

दिवाळीच्या काळात विविध ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर आकर्षक सवलती आणि ऑफर्स दिल्या जातात. या ऑफर्सच्या नावाखाली सायबर भामटे बनावट लिंक पाठवून नागरिकांची वैयक्तिक माहिती, बँक खात्याचे तपशील, ओटीपी तसेच आर्थिक व्यवहारांशी संबंधित माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. खरेदी करताना केवळ विश्वासार्ह आणि अधिकृत वेबसाईटचाच वापर करावा.

तसेच आपण कोणतीही ऑनलाइन ऑर्डर केलेली नसताना आपल्या नावाने आलेली ऑर्डर स्वीकारू नये. अनोळखी व्यक्तींकडून येणारे फोन, संदेश, क्यूआर कोड आणि संशयास्पद पेमेंट लिंक यापासून दूर राहावे. कोणालाही बँक खात्याची गोपनीय माहिती, एटीएम पिन किंवा ओटीपी सांगू नये. केवळ आकर्षक सवलतींच्या आमिषाला बळी पडून घाईघाईने आर्थिक व्यवहार करू नयेत.

सायबर फसवणूक झाल्यास काय करावे?

ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वेळ न घालवता तात्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच केंद्र शासनाच्या अधिकृत सायबर क्राईम तक्रार पोर्टलवर www.cybercrime.gov.in येथे तक्रार नोंदवावी. तक्रार करताना व्यवहाराचे तपशील, संदेश आणि उपलब्ध पुरावे जतन करून ठेवावेत.

दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. मात्र, सणाच्या उत्साहात ऑनलाइन व्यवहार करताना निष्काळजीपणा करू नका. स्वतः सावध राहा आणि कुटुंबीयांनाही सायबर फसवणुकीबाबत जागरूक करा. नागरिकांनी सतर्कता बाळगून सुरक्षित दिवाळी साजरी करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी केले आहे.

सतर्क राहा, सुरक्षित राहा… सायबर गुन्हेगारांपासून स्वतःचे संरक्षण करा!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने