आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी मंत्री प्रकाश आबिटकर यांचा हिंगोलीतून आरोग्य संवादआरोग्य संवाद यात्रेअंतर्गत आरोग्य संस्थांची पाहणी, आरोग्य योजनांचा आढावा आणि लाभार्थ्यांशी थेट संवाद

आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी मंत्री प्रकाश आबिटकर यांचा हिंगोलीतून आरोग्य संवाद

आरोग्य संवाद यात्रेअंतर्गत आरोग्य संस्थांची पाहणी, आरोग्य योजनांचा आढावा आणि लाभार्थ्यांशी थेट संवाद

हिंगोली, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ :
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी, लोकाभिमुख आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने दि. १ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीत राज्यभर ‘आरोग्य संवाद यात्रा’ राबविण्यात येत आहे. या यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत कितपत पोहोचत आहे, आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध सुविधांचा दर्जा, नागरिकांचे अनुभव आणि आरोग्य सेवांमधील अडचणी जाणून घेण्यात येणार आहेत. या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री श्री. प्रकाश आबिटकर हे सोमवार, दि. २ नोव्हेंबर रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन आरोग्य यंत्रणेचा सविस्तर आढावा घेणार असून विविध स्तरांवरील पदाधिकारी, अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

मंत्री श्री. आबिटकर हे दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी नांदेड येथून वसमतकडे प्रयाण करणार आहेत. यावेळी ते वसमत येथील मा. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्रास भेट देऊन पाहणी करणार आहेत. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय, वसमत येथे भेट देऊन आरोग्य सुविधांची पाहणी व कामकाजाचा आढावा घेणार आहेत. तसेच वसमत तालुक्यातील दुष्काळग्रस्त क्षेत्राची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

सकाळी ११.३० वाजता आमदार श्री. संतोष बांगर यांच्या समवेत कळमनुरी तालुक्यातील बाळापूर येथे विविध आरोग्य संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेऊन आरोग्य योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यानंतर हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट देऊन कॅथलॅब व अन्य वैद्यकीय सुविधांची पाहणी करणार आहेत. तसेच हिंगोली शहरातील लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटल आणि ढाले हॉस्पिटल येथे सदिच्छा भेट देणार आहेत.

दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहातून दूरदृश्यप्रणालीद्वारे हिंगोली जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत विविध आरोग्य समित्यांचे पदाधिकारी व अधिकारी यांच्याशी आरोग्य संवाद साधणार आहेत. या संवादाच्या माध्यमातून आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी, स्थानिक पातळीवरील अडचणी आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात येणार आहे.

या दौऱ्यादरम्यान मंत्री महोदय विविध आरोग्य योजनांच्या लाभार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेटी देणार आहेत. यामध्ये पॅलिएटिव्ह केअर सेवा घेणारे रुग्ण, सिकलसेल रुग्ण, आरोग्य संस्थांमध्ये प्रसूती झालेल्या माता, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया झालेली बालके, क्षयरोग रुग्ण तसेच जननी सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय कर्करोग तपासणी मोहिमेतील लाभार्थ्यांचीही भेट घेऊन त्यांना उपलब्ध झालेल्या आरोग्य सेवांची माहिती जाणून घेणार आहेत.

जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानासह ‘तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ या उपक्रमाचाही आढावा घेण्यात येणार आहे. आरोग्य संस्थांमधील औषधसाठा, वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता, मनुष्यबळ, स्वच्छता, पाणीपुरवठा, जैववैद्यकीय कचऱ्याचे संकलन व शास्त्रोक्त विल्हेवाट, संदर्भ सेवा, रुग्णवाहिका व्यवस्था, बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवा तसेच लसीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी या बाबींची सविस्तर तपासणी करण्यात येणार आहे.

आरोग्य संवाद यात्रेचा मुख्य उद्देश केवळ आरोग्य संस्थांची पाहणी करणे नसून, नागरिकांना प्रत्यक्ष मिळणाऱ्या आरोग्य सेवांचा अनुभव जाणून घेऊन त्यातील त्रुटी दूर करणे, चांगल्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता वाढविणे हा आहे. नागरिकांच्या सूचना व अनुभवांच्या आधारे आरोग्य सेवा अधिक दर्जेदार, पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी या यात्रेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने