मसोड आरोग्य केंद्रात ‘सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा’ प्रशिक्षण
प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण व लोककेंद्रित करण्यावर भर : सीईओ विवेक गायकवाड
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
4 ऑक्टोंबर 2026
हिंगोली, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोककेंद्रित करण्याच्या उद्देशाने सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा (Comprehensive Primary Health Care – CPHC) अंतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम कळमनुरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, मसोड येथे नुकताच उत्साहात पार पडला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके आणि नोडल अधिकारी डॉ. रवींद्र पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाच्या पातळीवरच अधिकाधिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्य कर्मचाऱ्यांचे ज्ञान व कौशल्य वृद्धिंगत करणे आणि अनावश्यक रुग्ण रेफरल कमी करणे, हा प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश होता.
या प्रशिक्षणासाठी जनरल फिजिशियन डॉ. नारायण भालेराव, वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. निशांत थोरात, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सुरज बोडखे तसेच जिल्हा प्रशिक्षण संघाच्या शाखा सदस्य शोभा पवार, ज्योती बांगर आणि नंदा चव्हाण यांनी प्रमुख मार्गदर्शक व प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले.
‘Resolve More, Refer Less’ या संकल्पनेवर भर
प्रशिक्षणादरम्यान ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सेवा अधिक परिणामकारक करण्यासाठी ‘Resolve More, Refer Less’ अर्थात स्थानिक पातळीवर जास्तीत जास्त आरोग्य समस्या सोडवून अनावश्यक रेफरल टाळण्याचे आवाहन आरोग्य कर्मचाऱ्यांना करण्यात आले.
आयुष्मान आरोग्य मंदिर व उपकेंद्रांच्या माध्यमातून समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक आणि आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा थेट ग्रामस्थांपर्यंत पोहोचवली जाते. आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळाल्यास ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत सकारात्मक व अमूलाग्र बदल घडवून आणता येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
गाव पातळीवर माता व बालमृत्यू रोखणे, क्षयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या आजारांचे वेळेत स्क्रीनिंग करणे, नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवणे, गृहभेटी घेणे तसेच आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यावर विशेष भर देण्यात आला.
सीपीएचसीच्या १३ घटकांवर सविस्तर मार्गदर्शन
प्रशिक्षणामध्ये सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवेच्या १३ प्रमुख घटकांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये गरोदरपण, प्रसूती व प्रसूती पश्चात काळजी, नवजात व अर्भक आरोग्य सेवा, बालक व किशोरवयीन आरोग्य, कुटुंब नियोजन व प्रजनन आरोग्य, संसर्गजन्य आजारांचे व्यवस्थापन, सामान्य व किरकोळ आजारांवरील उपचार, असंसर्गजन्य आजारांचे नियंत्रण, डोळे व कानांचे प्राथमिक आरोग्य, मौखिक आरोग्य, वृद्धापकाळ व पॅलिएटिव्ह केअर, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, मानसिक आरोग्य सेवा तसेच योग व आयुष पद्धती यांचा समावेश होता.
गरोदर महिलांची वेळेवर नोंदणी, नियमित तपासण्या, सुरक्षित संस्थात्मक प्रसूती आणि प्रसूतीनंतर माता व नवजात बालकांची योग्य काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नवजात बालकांना जन्मानंतरची तातडीची काळजी, जन्मानंतर लवकर स्तनपान, नियमित लसीकरण तसेच कुपोषण व संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण याबाबतही माहिती देण्यात आली.
बालकांच्या वाढ व विकासाचे नियमित निरीक्षण, किशोरवयीन मुला-मुलींच्या आरोग्यविषयक समस्या, पोषण, कुटुंब नियोजन आणि प्रजनन आरोग्य याबाबत समुपदेशनाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.
क्षयरोग, मलेरिया, डेंग्यू, एचआयव्ही आदी संसर्गजन्य आजारांचे सक्रिय सर्वेक्षण, वेळेत निदान व उपचार यासोबतच ताप, सर्दी, खोकला, अतिसार यांसारख्या सामान्य आजारांवर प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावरच मानक उपचार पद्धतीनुसार सेवा देण्यावर भर देण्यात आला.
असंसर्गजन्य आजारांच्या स्क्रीनिंगवर विशेष लक्ष
मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे नियमित स्क्रीनिंग करण्याचे महत्त्व प्रशिक्षणात अधोरेखित करण्यात आले. नागरिकांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.
डोळ्यांचे व कानांचे प्राथमिक आरोग्य, दृष्टीदोष, मोतीबिंदू, श्रवणदोष यांचे प्राथमिक टप्प्यात निदान करून आवश्यक उपचारासाठी योग्य मार्गदर्शन करण्याबाबतही प्रशिक्षण देण्यात आले. मौखिक आरोग्याच्या दृष्टीने दातांची स्वच्छता, मुखाच्या कर्करोगाचे प्राथमिक स्क्रीनिंग आणि तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला.
वृद्ध नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या, दीर्घकालीन व असाध्य आजारांनी त्रस्त रुग्णांना पॅलिएटिव्ह केअरच्या माध्यमातून वैद्यकीय तसेच मानसिक आधार देणे, आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्राथमिक उपचार उपलब्ध करून देणे आणि रुग्णवाहिका सेवेचा प्रभावी वापर याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
मानसिक आरोग्य व योग-आयुष पद्धतीवरही भर
मानसिक आरोग्य हा प्राथमिक आरोग्य सेवेचा महत्त्वाचा भाग असून नैराश्य, ताणतणाव आणि व्यसनाधीनता यांची प्राथमिक स्तरावर ओळख करून रुग्णांना योग्य समुपदेशन व आवश्यक उपचारासाठी मार्गदर्शन करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
निरोगी जीवनशैलीसाठी योग, आयुर्वेद आणि होमिओपॅथी यांचा पूरक पद्धतीने वापर व प्रसार करण्याबाबतही माहिती देण्यात आली.
आरोग्य सेवा ‘रुग्णस्नेही’ करण्याचा संकल्प
आरोग्य सेवा देताना केवळ वैद्यकीय ज्ञान पुरेसे नसून प्रभावी संवाद कौशल्य, सकारात्मक देहबोली, सहानुभूती आणि नेतृत्वगुण यांचा वापर महत्त्वाचा असल्याचे प्रशिक्षकांनी सांगितले. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी आपुलकीने संवाद साधून त्यांचा विश्वास संपादन करणे आणि आरोग्य सेवा अधिक रुग्णस्नेही व परिणामकारक करण्याचा संकल्प या प्रशिक्षणाद्वारे करण्यात आला.
या दोन दिवसीय प्रशिक्षणास समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, गटप्रवर्तक तसेच आशा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत गुणवत्तापूर्ण प्राथमिक आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा