हिंगोली जिल्ह्यात २ लाख ८८ हजार बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप होणार!राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त २७ ऑक्टोबरला मोहीम; ३ नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिनसीईओ विवेक गायकवाड

हिंगोली जिल्ह्यात २ लाख ८८ हजार बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप होणार
राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त २७ ऑक्टोबरला मोहीम; ३ नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिन

सीईओ विवेक गायकवाड 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली, दि. 25ऑक्टोबर : बालकांचे आरोग्य सुधारावे, कुपोषण व रक्तक्षयाचे प्रमाण कमी व्हावे आणि जंतसंसर्गापासून बालकांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने हिंगोली जिल्ह्यात २७ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील २ लाख ८८ हजार २८१ बालकांना व किशोरवयीन मुला-मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी ही माहिती दिली.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके आणि नोडल अधिकारी डॉ. रविंद्र पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि महिला व बालविकास विभाग यांच्या समन्वयातून जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत जंतनाशक गोळ्या पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जंतसंसर्गामुळे आरोग्यावर होतो परिणाम

लहान मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुला-मुलींमध्ये आतड्यांतील जंतसंसर्ग झाल्यास रक्तक्षय व कुपोषणाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे मुलांच्या शारीरिक वाढीवर, आरोग्यावर, एकाग्रतेवर, शैक्षणिक कामगिरीवर तसेच सर्वांगीण विकासावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. जंतसंसर्गाचे प्रमाण कमी करून मुलांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांमधून वाटप

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या मोहिमेत पात्र लाभार्थ्यांना अल्बेंडाझोल या जंतनाशक औषधाच्या गोळ्या देण्यात येणार आहेत. वयोगटानुसार औषधाची मात्रा निश्चित करण्यात आली असून, आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनानुसार गोळ्या दिल्या जाणार आहेत.

शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या माध्यमातून, तर अंगणवाडी केंद्रांतील बालकांना आणि शाळाबाह्य मुला-मुलींना अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. या मोहिमेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र बालकांपर्यंत पोहोचावा, यासाठी संबंधित विभागांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

३ नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिन

२७ ऑक्टोबर रोजी विविध कारणांमुळे जंतनाशक गोळी घेण्यापासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांसाठी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मॉप-अप दिन आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे मोहिमेच्या पहिल्या दिवशी गोळी घेता न आलेल्या पात्र बालकांना या दिवशी संधी उपलब्ध होणार आहे.

स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन

जंतसंसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेला विशेष महत्त्व आहे. मुलांनी नियमितपणे साबणाने हात धुणे, स्वच्छतागृहाचा वापर करणे, स्वच्छ व सुरक्षित पाणी पिणे, अन्नपदार्थ स्वच्छ ठेवणे तसेच बाहेर जाताना शूज किंवा चप्पल वापरणे यांसारख्या सवयी अंगीकाराव्यात, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

जंतनाशक गोळी घेतल्यानंतर कोणताही त्रास जाणवल्यास किंवा औषधाबाबत काही शंका असल्यास संबंधित आरोग्य कर्मचारी अथवा वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. आरोग्यविषयक सल्ल्यासाठी टोल फ्री क्रमांक १०४, तर तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी १०८ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेत पालक, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून जिल्ह्यातील प्रत्येक पात्र बालकाला या मोहिमेचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم