हिंगोलीत विवाहितेचा विनयभंग करून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केसाला धरून खाली पाडत थापडाबुक्क्यांनी मारहाण; जीवे मारण्याचीही धमकी

हिंगोलीत विवाहितेचा विनयभंग करून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

केसाला धरून खाली पाडत थापडाबुक्क्यांनी मारहाण; जीवे मारण्याचीही धमकी
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
२४ ऑक्टोबर 2026

हिंगोली : हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांचननगर, कारवाडी येथे एका २६ वर्षीय विवाहितेचा विनयभंग करून तिला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून दोन जणांविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी संगनमत करून हा प्रकार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मा जब्बार खाँ पठाण (वय २६, रा. कांचननगर, कारवाडी, ता. जि. हिंगोली) या २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी असताना हा प्रकार घडला. यावेळी आरोपी पिंटू मुरकूटे (वय ३५, रा. काकडधाबा, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) याने फिर्यादीचा विनयभंग करून तिला शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप आहे.

तसेच, आरोपी अरुणा मुरकूटे (वय ४०, रा. आनंदनगर, बळसोंड, ता. जि. हिंगोली) हिने फिर्यादीच्या केसांना धरून तिला खाली पाडले आणि थापडाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या दोघांनी फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तोंडी फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६६०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४, ३३३, ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२३ ऑक्टोबर रोजी पहाटे २.४० वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस  निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घुले करीत आहेत. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक घुले व पोलीस हवालदार खोडवे यांनी भेट दिली.

आरोपी अद्याप अटकेत नाहीत

या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसून, प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासाअंती पुढील कारवाई केली जाणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने