औंढ्यात दहशत निर्माण करणाऱ्या टोळीतील तिघे वर्षभरासाठी हद्दपार!
पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या प्रस्तावावर अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांची कारवाई; अनेक गावगुंड पोलिसांच्या रडारवर
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
02 नोव्हेंबर 2026
औंढा नागनाथ परिसरात गुंडगिरीच्या माध्यमातून दहशत निर्माण करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरविणाऱ्या टोळीतील तिघांना हिंगोली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी सादर केलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावावर अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली असून, परिसरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये टोळीप्रमुख पप्पू ऊर्फ बाळू रावसाहेब बोंगाणे (रा. उमरा), गोविंद ऊर्फ बाळू देवराव पावडे (रा. उमरा) आणि जालिंदर चांदोजी बोखारे (रा. वाघी, ता. वसमत) यांचा समावेश आहे.** या तिघांच्या गुंडवृत्तीच्या वर्तनामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते.
संबंधित व्यक्तींच्या सातत्यपूर्ण गुंडगिरीमुळे सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत आवश्यक माहिती संकलित केली. त्यानंतर कायदेशीर तरतुदीनुसार तिघांना हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सादर केला होता.
या प्रस्तावाची पडताळणी करून अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांनी तिघांना एक वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश जारी केले. त्यामुळे आता संबंधित तिघांना निर्धारित कालावधीत जिल्ह्याच्या हद्दीत राहता येणार नाही.
अनेक गावगुंड पोलिसांच्या रडारवर!
औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू केला आहे. नागरिकांना त्रास देणारे, दहशत निर्माण करणारे आणि सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचविणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांचे लक्ष आहे. आगामी काळातही अशा व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
गुंडगिरीला थारा नाही, कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश या हद्दपारीच्या कारवाईतून देण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा