हिंगोलीतील चार आरोपींची गंभीर गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता
ॲड अजय उर्फ बंटी देशमुख
जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; सरकार पक्षातर्फे १८ साक्षीदारांची तपासणी
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
03 नोव्हेंबर 2026
हिंगोली : हिंगोली शहरातील बहुचर्चित जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात माजी युवा सेना शहरप्रमुख सागर काळे यांच्यासह चार आरोपींची जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालामुळे संबंधित प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी पूर्ण झाली असून, पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेल्या आरोपींना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये सागर काळे (माजी युवा सेना शहरप्रमुख), विक्की काळे, करण राजपूत आणि अक्षय गिरी (सर्व रा. हिंगोली) यांचा समावेश होता. त्यांच्याविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात सन २०२२ मध्ये गुन्हा क्रमांक ५४/२०२२ (विशेष खटला क्रमांक ३१/२०२२) दाखल करण्यात आला होता.
जीवघेण्या हल्ल्याच्या आरोपाखाली गंभीर कलमे
संबंधित प्रकरणात भारतीय दंड विधानाच्या कलम १४३, १४७, १४८, १४९, ३०७, ३२४, ३२६, ४४७, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१)(आर), ३(१)(एस) आणि ३(२)(व्हीए) अन्वयेही गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. पुढील तपासादरम्यान या प्रकरणात मकोका कायद्याची कलमेही वाढविण्यात आली होती.
१८ साक्षीदारांची साक्ष, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी दोषारोपपत्र हिंगोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले होते. न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण १८ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर करण्यात आलेल्या बाबींचा विचार करून न्यायालयाने २ नोव्हेंबर २०२६ रोजी निकाल दिला.
मा. न्यायाधीश एस. एन. माने यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर चारही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय दिला.
आरोपींच्या वतीने वकिलांची भक्कम बाजू
आरोपींच्या वतीने ॲड. सतीश देशमुख, ॲड. सौ. सुनीता देशमुख, ॲड. शामकांत देशमुख आणि ॲड. प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. अजय (बंटी) पंडितराव देशमुख यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
या खटल्यात ॲड. शरद देशमुख, ॲड. अदित ऊर्फ शुभम देशमुख, ॲड. राहुल देशमुख, ॲड. विराज देशमुख, ॲड. योगेश खिल्लारी (पाटील), ॲड. अविनाश राठोड, ॲड. रजत देशमुख, ॲड. प्रकाश मगरे, ॲड. आनंद खिल्लारे, ॲड. रुपाली खिल्लारे, ॲड. सुमित सातव, ॲड. लखन पठाडे, ॲड. मुदतशिर अ. रहिम, ॲड. श्रद्धा जैस्वाल, ॲड. आकाश चव्हाण, ॲड. गजानन घुगे, ॲड. सुजित गायकवाड, ॲड. शुभम कदम, ॲड. सुमित कदम, ॲड. शिवम देशमुख, ॲड. सचिन सोनुने, ॲड. तुषार देशमुख, ॲड. सूरज कदम, ॲड. संदीप डवले, ॲड. शुभम परिस्कर आणि कस्तुरी कासाट यांनी सहकार्य केले.
सन २०२२ पासून चर्चेत असलेल्या या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात चारही आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याने हिंगोलीच्या न्यायालयीन वर्तुळात या निकालाची चर्चा होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा