हिंगोली जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यास प्राधान्य द्या! कॅथलॅबच्या माध्यमातून हिंगोलीकरांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरजन आरोग्य संवाद यात्रेदरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी; सुविधांचे केले कौतुक

 हिंगोली जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यास प्राधान्य द्या!

 कॅथलॅबच्या माध्यमातून हिंगोलीकरांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

जन आरोग्य संवाद यात्रेदरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी; सुविधांचे केले कौतुक

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
03 नोव्हेंबर  2026 
हिंगोली,  जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे. हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या कॅथलॅबच्या माध्यमातून नागरिकांना उच्च दर्जाची हृदयविकार उपचार सुविधा उपलब्ध होत आहे. ही बाब जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून, रुग्णांनीही शासकीय रुग्णालयात उपलब्ध असलेल्या आधुनिक आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
जन आरोग्य संवाद यात्रेदरम्यान मंत्री प्रकाश आबिटकर यांनी हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन तेथील विविध आरोग्य सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी विशेषतः नव्याने उभारण्यात आलेल्या सुसज्ज कॅथलॅबची पाहणी करून त्यांनी तेथील यंत्रणा, उपलब्ध सुविधा आणि रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती जाणून घेतली.

या पाहणीप्रसंगी आमदार संतोष बांगर, आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ. कांचन वानेरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके तसेच छत्रपती संभाजीनगर येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. संतोष कडले यांची उपस्थिती होती.

कॅथलॅबमुळे हिंगोलीकरांना मोठा दिलासा
जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक स्वरूपात कॅथलॅबची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हृदयविकाराशी संबंधित तपासणी व उपचारांसाठी ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज कमी होण्यास मदत होणार आहे. शासकीय रुग्णालयातच आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब असल्याचे मंत्री आबिटकर यांनी नमूद केले.

आमदार संतोष बांगर यांच्याकडून रुग्णालयाच्या कामाचे कौतुक
मंत्री आबिटकर यांनी रुग्णालयातील कॅथलॅबसह विविध विभागांची पाहणी केली. यावेळी आमदार संतोष बांगर यांनीदेखील जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांचे कौतुक केले. जिल्ह्यातील रुग्णांना रुग्णालयाच्या माध्यमातून उत्तम आरोग्य सुविधा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या विविध वैद्यकीय सेवा, उपचार व्यवस्था, आधुनिक उपकरणे आणि रुग्णांसाठी राबविण्यात येणाऱ्या सुविधांची सविस्तर माहिती मंत्री महोदयांना दिली.

शासकीय आरोग्य यंत्रणेने आधुनिक सुविधांसोबतच सेवेचा दर्जा कायम राखावा, सर्वसामान्य रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने विशेष लक्ष द्यावे, असा संदेश या पाहणी दौऱ्यातून मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने