उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत उद्या हिंगोली दौऱ्यावर; गुंतवणूक परिषदेसह मराठी भाषा विभागाचा घेणार आढावा कै. खासदार रामराव वडकुते यांच्या कुटुंबीयांची घेणार सांत्वनपर भेट; शिवसेना पदाधिकाऱ्यांशीही साधणार संवाद

 उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत उद्या हिंगोली दौऱ्यावर; गुंतवणूक परिषदेसह मराठी भाषा विभागाचा घेणार आढावा
 शिवसेना पदाधिकाऱ्यांशीही साधणार संवाद
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 

हिंगोली, दि. २६ नोव्हेंबर : राज्याचे उद्योग, गुंतवणूक, सेवा व मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ. उदय सामंत हे शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील गुंतवणुकीच्या संधींचा आढावा घेण्यासोबतच मराठी भाषा विभागाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. तसेच जिल्ह्यातील साहित्यिकांशी संवाद साधणार असून, शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठकही घेणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक विकास आणि गुंतवणुकीच्या विषयांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

मंत्री डॉ. उदय सामंत हे शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता नांदेड विमानतळ येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण करतील. सकाळी १० वाजता हिंगोलीतील कोथळज रोड, नाईक नगर येथे दिवंगत खासदार कै. रामराव वडकुते यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत.

यानंतर सकाळी १०.३० वाजता अकोला रोडवरील शांती हॉटेल येथे आयोजित हिंगोली जिल्हा गुंतवणूक परिषदेला ते उपस्थित राहतील. या परिषदेत जिल्ह्यातील औद्योगिक विकास, नवीन उद्योगांची उभारणी, गुंतवणुकीच्या उपलब्ध संधी आणि उद्योजकांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासंदर्भात चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात हिंगोली जिल्ह्यातील मराठी भाषा विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यातील साहित्यिकांसमवेत संवाद साधून मराठी भाषा, साहित्य आणि भाषेच्या संवर्धनाशी संबंधित विषयांवर चर्चा केली जाणार आहे.

दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संघटनात्मक बाबी आणि पक्षाच्या कामकाजासंदर्भात चर्चा होणार आहे. दौऱ्याच्या अखेरीस दुपारी ३ वाजता मंत्री डॉ. उदय सामंत हे हिंगोली येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण करणार आहेत.

उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या या दौऱ्यात गुंतवणूक परिषद, मराठी भाषा विभागाचा आढावा आणि साहित्यिकांशी संवाद असे विविध महत्त्वाचे कार्यक्रम होणार असल्याने जिल्ह्याच्या औद्योगिक व सांस्कृतिक क्षेत्राच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने