हिंगोलीत पशुपैदास प्रक्षेत्राच्या जागेवर होणार वैद्यकीय महाविद्यालय
नांदेडच्या पथकाकडून पाहणी ,जागा देण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा हिरवा कंदील...!
हिंगोली, -/ भरारी वृत्त/-
हिंगोलीत पशुपैदास प्रक्षेत्राच्या २५ एकर जागेवर लवकरच वैद्यकिय महाविद्यालयाची उभारणी होणार असून त्यासाठी आरोग्य विभागाच्या पथकाने शुक्रवारी पाहणी केली .
हिंगोली येथे वैद्यकिय महाविद्यालय नसल्यामुळे अत्याधुनिक आरोग्य सेवेचा प्रश्न निर्माण झाला आहे . त्यातच आता गुरुत्वीय लहरींच्या अभ्यासासाठी लिगोची अंतरराष्ट्रीय प्रयोगशाळेची उभारणी होणार आहे . त्यामुळे या ठिकाणी वैद्यकिय महाविद्यालय सुरु व्हावे अशी अपेक्षा नागरीकांतून व्यक्त केली जात होती. त्यानंतर खासदार राजीव सातव यांनी पालकमंत्री वर्षा गायकवाड , वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन हिंगोलीत वैद्यकिय महाविद्यालय सुरु करण्याबाबत मागणी मांडली .यावेळी वैद्यकिय शिक्षण मंत्री देशमुख यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला .
त्यानंतर शुक्रवारी नांदेड येथील वैद्यकिय महाविद्यालयाचे डॉ . विवेक सहस्त्रबुध्दे , डॉ . वैशाली इनामदार यांच्या पथकाने हिंगोलीत येऊन पाहणी केली . यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ . राजेंद्र सुर्यवंशी , डॉ . मंगेश टेहरे , डॉ . गोपाल कदम , डॉ . दीपक मोरे यांची उपस्थिती होती . या पथकाने शासकिय रुग्णालयातील अंतररुग्ण विभाग , बाह्यरुग्ण विभाग त्या ठिकाणी उपचारासाठी येणारे रुग्ण , रुग्णालयातील यंत्रसामुग्री याची पाहणी केली . या शिवाय जागेचीही पाहणी केली . त्यानंतर या पथकाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेऊन चर्चा केली . त्यावेळी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी पशुपैदास प्रक्षेत्राची २५ एकर जागा देण्यास मान्यता दिली आहे .
या पथकाने हिंगोलीतील सविस्तर माहिती तसेच उपलब्ध जागा , शासकिय रुग्णालयातील सुविधा याबाबतचा सविस्तर अहवाल तयार केला आहे.दरम्यान , राज्य शासनाने तातडीने पाठविलेल्या या पथकामुळे हिंगोलीत लवकरच वैद्यकिय महाविद्यालयाची उभारणी होणार असल्याने हालचाली गतिमान झाल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा