आंबा येथील भुयारी मार्ग तात्काळ मोकळा करून वाहतूक सुरळीत करा -खा.हेमंत पाटील
महाराष्ट्र 24 न्यूज
13 जुलै 2021
हिंगोली : वसमत तालुक्यातील आंबा चोंडी स्टेशनजवळ कुरुंदा रस्त्यावर असलेल्या रेल्वे गेटच्या भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. या ठिकाणच्या पाण्याचा बंदोबस्त न केल्याने रविवारी झालेल्या पावसामुळे पुलाखाली पाणी साचून त्यास तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. परिणामी रहदारीसाठी असलेला एकमेव मार्ग बंद झाल्याने नागरिकांचा संपर्क तुटला आहे.
खासदार हेमंत पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी रेल्वे अधिकाऱ्यांना समवेत भेट देऊन पाहणी केली व भुयारी मार्ग मोकळा करून वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
मागील बऱ्याच दिवसापासून आंबा चोंडी येथील रेल्वे भुयारी मार्गाचा प्रश्न प्रलंबित असून रेल्वेमार्ग तयार करताना रेल्वे प्रशासनाने कोणताही पर्यायी मार्ग काढला नव्हता. त्याचे पडसाद पहिल्याच दमदार झालेल्या पावसात दिसून आले. यापूर्वी सुद्धा खासदार हेमंत पाटील यांनी याठिकाणी पाहणी करून पर्यायी रस्ता करून देण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने रविवारी झालेल्या पावसाने पुलाखाली पाणी साचल्याने आंबा चोंडी ते कुरुंदा हा प्रमुख मार्ग बंद झाला आहे. याबाबत ग्रामस्थांनी खासदार हेमंत पाटील यांच्याकड तक्रार करताच त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली. याठिकाणी साचलेल्या पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी तसेच पर्यायी मार्गावर भराव टाकून रस्ता तात्काळ मोकळा करावा आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही याचीही काळजी संबंधित कंत्राटदाराने घ्यावी असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.
إرسال تعليق